Monsoon Diet : पावसाळ्यातील आजारांपासून वाचायचे तर खा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या फायदे

| Updated on: Jul 18, 2022 | 4:23 PM

पावसाळ्यात विविध आजार पसरू शकतात. दूषित पाणी, अन्न यामुळे अनेक रोग होऊ शकतात. अशावेळी निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विविध पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.

Monsoon Diet : पावसाळ्यातील आजारांपासून वाचायचे तर खा हे पदार्थ, जाणून घ्या फायदे
पावसाळ्यातील आजारांपासून वाचायचे तर खा 'हे' पदार्थ; जाणून घ्या फायदे
Image Credit source: t v 9
Follow us on

Monsoon Diet Tips : कडक उन्हाळ्यानंतर वातावरणात आल्हाद गारवा घेऊन येणारा पावसाळा (Monsoon )सर्वांनाच आवडतो. मात्र या पावसासोबत अनेक आजारही येतात. सर्दी , खोकला , ताप , दूषित पाणी किंवा अन्नामुळे होणारे आजार, मलेरिया, डेंग्यू, डायरिया यासारख्या आजारांमुळे (diseases) लोकं त्रस्त होतात. या काळात आपली पचनशक्तीही थोडी मंदावलेली असते, त्यामुळे पाण्यातून किंवा एखाद्या खाद्यपदार्थामुळेही त्रास होऊ शकतो. अशा वेळी आपण आपल्या तब्येतीची नीट काळजी घेऊन निरोगी राहणे महत्वाचे ठरते. रोज उकळलेले पाणी पिणे, बाहेरचे न खाणे हे नियम पावसाळ्यात तरी पाळलेच पाहिजेत. तसेच रोजच्या आहारात खालीलपैकी काही पदार्थांचा (food) समावेश केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच पण पावसामुळे होणाऱ्या आजारांपासूनही वाचतो. जाणून घेऊया, पावसाळ्यात कोणते पदार्थ रोज खाणे गरजेचे आहे.

लसूण

लसणात ॲंटी-ऑक्सीडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोजच्या आहारात लसणाचा समावेश केल्याने पचनशक्ती सुधारते. तसेच मेटाबॉलिज्मही वाढते. भाजी किंवा आमटीत लसूण घालून ते खाऊ शकता. किंवा इतर पदार्थांमध्येही त्याचा समावेश करुन सेवन करु शकता.

आलं

आलं घातलेल्या चहाचा स्वाद तर सगळ्यांनाच आवडतो. पावसाळ्यात आल्याचे सेवन करणे खूप लाभदायक असते. आल्यामुळे तुमचा मूड सुधारतो. मेटाबॉलिज्म वाढते. पावसाळ्यात आलं खाणं तब्येतीसाठीही चांगलं असतं. चहा किंवा जेवणातून जमत नसेल तर आलं घालून पाणी उकळून, ते पाणीही पिऊ शकता. निरोगी शरीरासाठी आलं खूप फायदेशीर ठरतं.

हे सुद्धा वाचा

नासपती

एक चविष्ट फळ एवढीच नासपतीची ओळख नाही. नासपती खाल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. त्यामुळे अनेक आजांरापासून बचाव होतो.

हळद

विविध औषधी गुणधर्मांनी भरपूर अशा हळदीला भारतीय स्वयंपाकाघरात मसाल्याच्या डब्यात एक महत्वाचे स्थान मिळाले आहे. हळदीमध्ये ॲंटीसेप्टिक आणि ॲंटी-बायोटिक गुण असतात. पावसाळ्यात हळद घातलेले गरम दूध पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. त्यामुळे सर्दी, खोकला अशा अनेक आजारांपासून संरक्षण होते. तसेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

काळी मिरी

आहारात काळी मिरीचा समावेश करून त्याचे सेवन करणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. अंड्यांचा पदार्थ करताना किंवा अगदी साध्या खिचडीतही काळी मिरी घालू शकता. काळी मिरीमुळे पदार्थाची चव तर सुधारतेच पण ती निरोगी शरीरासाठीही गरजेची आहे. काळी मिरी ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी अशा अनेक आजारात औषधी ठरते.

सफरचंद

An apple a day, keeps the doctor away,ही म्हण तर सर्वांनाच माहीत असेल ना. रोज एक सफरचंद खाल्याने डॉक्टरांचा चेहराही बघावा लागत नाही, असं म्हणतात ते उगाच नाही. विशेषत: पावसाळ्यात सफरचंद खाणे, आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. त्यामुळे पचनशक्ती सुधारते. त्यामुळे रोज एक तरी सफरचंद नक्की खावे.

बीट

बीटाचे सेवन सॅलॅडमधून किंवा दही घालून केलेल्या कोशिंबीरीतून करता येते. त्याची भाजीही चविष्ट लागते. बीटामध्ये अनेक पोषक तत्वे आणि मिनरल्स असतात. बीट हे पोटॅशियम, फायबर आणि फॉलिक ॲसिडचा मोठा स्त्रोत आहे. आणि मुख्य म्हणजे त्यात कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल आणि निरोगी रहायचे असेल तर वरती नमूद केलेले पदार्थ रोजच्या आहारात नक्की समाविष्ट करा.