राजकोट : सध्या धकाधकीच्या आयुष्यात काहीच खर नाहीय. कधी, काय घडेल, सांगता येत नाही. एखाद्या आनंदाच्या, मंगल क्षणी दु:खद घटना घडून जाते, ज्याचा कोणी विचार केलेला नसतो. अशीच एक दुर्देवी घटना राजकोटमध्ये घडली. सध्या अचानक कार्डिअक अरेस्टमुळे मृत्यू होण्याच प्रमाण जास्त आहे. यात युवकांची संख्या लक्षणीय आहे. आता वयाच्या तिशी-पसंतीशी ह्दयविकारामुळे मृत्यू होत आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणारे आकडे भयावह आहेत.
राजकोटमध्ये एका 36 वर्षीय व्यक्तीचा गरबा खेळल्यानंतर अचानक मृत्यू झाला. अमित चौहान असं मृत व्यक्तीच नाव आहे. कौटुंबिक लग्न सोहळ्यात गरबा खेळून आल्यानंतर अमितचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
अस्वस्थ असल्याच कुठलही लक्षण नव्हतं
“कौटुंबिक लग्न सोहळ्यात आम्ही सर्व दांडीया आणि गरबा खेळत होतो. अमित चांगला वाटत होता. तो अस्वस्थ असल्याच कुठलही लक्षण दिसत नव्हतं. घरी आल्यानमंतर त्याने छातीत दु:खत असल्याची तक्रार केली. त्याला आम्ही रुग्णालयात घेऊन गेलो. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर अमितला मृत घोषित केले” असं अमितचा चुलतभाऊ लखमन चौहानने सांगितलं.
अचानक हार्ट अटॅकच प्रमाण का वाढलं?
अमित चौहानचा सोन्याचा व्यवसाय होता. मालवीय नगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. “दरदिवशी आमच्याकडे कार्डिअक अरेस्टची 8 ते 10 प्रकरण येतात. बहुतांश रुग्णांच वय 45 पेक्षा कमी असतं. तणाव, चुकीची जीवनशैली त्याशिवाय कोविड 19 मुळे झालेलं नुकसान यामुळे युवकांना कार्डिअक अरेस्टचा धोका वाढलाय” असं राजकोट सिव्हील हॉस्पिटलचे डॉ. राधेश्याम त्रिवेदी म्हणाले.
जवळपास 10 जणांचा अचानक मृत्यू
महिन्याभरापूर्वी 31 वर्षीय ग्राम सेवकाचा क्रिकेट टुर्नामेंट दरम्यान मोरबी येथे मृत्यू झाला होता. क्रिकेट खेळत असताना ह्दयविकाराच्या झटक्यामुळे अचानक हा युवक जागीच कोसळला. जवळपास 10 जणांचा अचानक ह्दय विकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला आहे. काहीजण खेळत होते, काही अन्य शारीरिक कामात व्यस्त होते.