नवी दिल्ली – गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणातील वायू प्रदूषणाची पातळी (Air Pollution) वाढत आहे. त्यामुळे अनेक लोकांना श्वसनाचे आजार होत आहेत. पण तुम्ही हे वाचून हैराण व्हाल की वायू प्रदूषणामुळे अनेक प्रकारचे मानसिक आजारही होत आहेत. देशाची राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये वायू प्रदूषणामुळे गेल्या महिन्याभरात नैराश्य (depression), चिंता (anxiety) आणि मानसिक तणाव (mental stress) या सारख्या मानसिक आजारांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की पीएम 2.5 च्या दीर्घकाळापर्यंत संपर्कात आल्यामुळे ब्लड ब्रेन बॅरिअरचे नुकसान होत आहे. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ व मनस्थलीच्या संस्थापक डॉ. ज्योती कपूर यांनी सांगितले की, गेल्या महिन्यापासून त्यांना चिंता आणि नैराश्याची अनेक प्रकरणं पाहायला मिळाली आहेत. कामासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांना हा त्रास झाल्याचे अधिक दिसून येत आहे. एखाद्या गोष्टीमुळे शारीरिक आजार असेल तर त्याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकेल. तसेच वायू प्रदूषणाचेही आहे.
मेंदूमध्ये न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात
प्रदूषणाचा मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो, असे अनेक अभ्यासांत आढळून आले आहे. हा परिणाम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो. श्वसनाच्या समस्या, झोप न लागणे आणि हवेतील धुक्यामुळे नीट न दिसणे यामुळे मेंदूत न्यूरोट्रान्समीटर सोडले जातात. प्रदूषणात असलेले काही कण आपल्या शरीरात जातात आणि नंतर ते श्वासावाटे रक्तात जातात. रक्ताभिसरण संपूर्ण शरीरात होते व त्यामुळे मज्जासंस्थेवरही परिणाम होतो. एक्यूआय खराब असल्यामुळे चिंता, डिप्रेशन आणि काही प्रकरणांमध्ये पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा त्रास होऊ शकतो.
प्रदूषणामुळे होतो मेंदूच्या कार्यावर परिणाम
ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विकास कुमार सांगतात की, प्रदूषणामुळे मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो. त्यामुळे लहान मुलांचे सर्वाधिक नुकसान होते. प्रदूषणाच्या संपर्कात आल्यानंतर, मुलांना न्यूरो-डेव्हलपमेंटसह कॉग्निटिव्ह फंक्शनची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे ज्यामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. गेल्या दोन आठवड्यांपासून काही अशा केसेस समोर आल्या आहेत ज्यामध्ये लोकांना चिंता वाटणे तसेच झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागला आहे. त्यापैकी सुमारे 95 टक्के लोक हे ऑफिसला जाणारे आहेत.
या गोष्टींची घ्या काळजी
वायू प्रदूषणाचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारी धोरणासह लोकांनी वैयक्तिक पातळीवरही पावले उचलणे आवश्यक आहे. घरात अथवा कामाच्या ठिकाणी झाडे लावावीत, हिरवळ राहील याची काळजी घ्यावी. रस्त्यावर व्यायाम करणे टाळावे. प्रदूषण कमी व्हावे यासाठी खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. तसेच प्रदूषण असताना बाहेर जाणे टाळावे.