सध्या भारतासह जगभरात मंकीपॉक्सने कहर माजवला आहे. कोरोना (Corona) महामारीनंतर मंकीपॉक्सच्या (Monkeypox) वाढत्या रुग्णांमुळे जगभरातील आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. या संदर्भात वेळोवेळी आरोग्य विषयक सूचना जारी केल्या जात आहेत. अनक रुग्णांचे निरीक्षण केले जात आहे आणि चाचण्याही सुरुच आहेत. त्याचबरोबर या आजारांपासून दूर राहण्यासाठी लोक खबरदारीही घेत आहेत. दरम्यान युसी डेव्हिस हेल्थ स्टडीनुसार, मंकीपॉक्सची लक्षणे आणि त्वचेवरील घावांवर उपचार करण्यासाठी टेकोव्हिरिमॅट (Tecovirimat) हे औषध सुरक्षित आणि प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. मंकीपॉक्स असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टेकोव्हिरिमॅट या ॲंटीव्हायरल औषधाचा वापर करण्याचे परिणाम काय होतात, याची नोंद घेण्यासाठी सुरू असलेले हे संशोधन सुरूवातीच्या टप्प्यात आहे.
टेकोव्हिरिमॅट (TPOXX) हे अन्न व औषध प्रशासनाने (FDA- Food and Drugs Administration) मंजूरी दिलेले औषध आहे. हे विषाणूमध्ये असलेले प्रोटीन संपवून त्यायचा शरीरात प्रसार होण्यापासून रोखते. डेव्हिसचे प्रमुख लेखक एंजल देसाई यांनी सांगितले की, आमच्याकडे मंकीपॉक्सच्या संसर्गावर टेकोव्हिरिमॅटच्या वापराबद्दल मर्यादित माहिती आहे, परंतु या रोगाच्या नैसर्गिक प्रगतीबद्दल बरेच काही शिकण्यासारखे आहे.
या संशोधना दरम्यान मंकीपॉक्स झालेल्या 25 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना टेकोव्हिरिमॅट थेरपी देण्यात आली होती. या रोग्यांच्या शरीरावरील अनेक भागांत तसेच चेहरा आणि जननेंद्रियावर अनेक घाव होते. त्या रुग्णांच्या वजनाच्या आधारावर त्यांना ही थेरपी 8 ते 12 तासांनंतर देण्यात येत होती.
या संधोधनातील माहितीनुसार, उपचार सुरू असताना 7 व्या दिवशी 40 टक्के रुग्णांचे घाव बरे झाले होते. तर उपचारांच्या 21 व्या दिवसापर्यंत 92 टक्के रुग्ण बरे झाले. या परीक्षणासाठी ज्या व्यक्तींची निवड करण्यात आली होती त्यामध्य सर्वजण पुरूष होते व त्यांचा वयोगट 27 ते 76 या दरम्यान होता. त्याव्यतिरिक्त 9 रुग्णांना एचआयव्ही झाला होता.