मुंबई : अनेकांना बऱ्याच शारिरिक समस्या (Problem) असतात. मात्र, प्रथम त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते. यामध्ये अनेकांना लघवी करताना त्रास होतो. मात्र, सुरूवातीला याकडे लक्ष दिले जात नाही. परंतू जर लघवी (Urination) करताना जळजळ, वेदना होत असतील तर आपण त्याकडे गांर्भियाने लक्ष देणे महत्वाचे आहे. लघवी करताना जो त्रास होतो त्याला डिस्युरिया (Dysuria) असे म्हणतात. लघवी करताना प्रामुख्याने प्रायव्हेट पार्ट्स आणि युरिनरी ट्रॅक्टमध्ये वेदना जाणवतात. मूत्राशयातून बाहेर आल्यानंतर ज्या नळीद्वारे मूत्र शरीरातून बाहेर पडते त्याला मूत्रमार्ग म्हणतात. डिस्युरियाच्या मुख्य कारणांपैकी एक म्हणजे मूत्रमार्गात संसर्ग हे असते.
डिस्युरियाची प्रमुख लक्षणे म्हणजे लघवी करताना वेदना, जळजळ ही आहेत. बऱ्याच केसेसमध्ये काही लोकांना लघवी करण्याच्या अगोदर किंवा नंतर वेदना सुरू होतात. तर काहींना युरिन पास होतानाच जळजळ सुरू होते. त्यामुळे जर तुम्हालाही लघवी करताना या समस्या येत असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण याकडे दुर्लक्ष केले तर समस्या वाढण्याची शक्यता असते.
लघवीशी संबंधीत काहीही समस्या असेल तर वेळ अजिबात घालवू नका आणि डाॅक्टरांचा सल्ला घ्या. लघवीचा वास येणे, वारंवार लघवी येणे, लघवी करताना रक्त येणे, उलट्या होणे, खाज सुटणे, कधी कधी लघवी केल्यावर ताप येणे आणि लघवी करताना त्रास होणे हे तर प्रमुख कारण आहे.
प्रायव्हेट पार्टमध्ये काही केमिकल प्रोडक्ट्स वापरल्याने ही समस्या उद्भवू शकते. बऱ्याच वेळा आपण अंघोळ करताना प्रायव्हेटवर साबण, स्किन वॉश किंवा फेसवाॅश लावतो. यामुळे लघवी करताना त्रास होण्याची शक्यता असते. तसेच मूत्राशय संसर्ग आणि व्हायरल मूत्राशय संसर्ग ही प्रमुख कारणे आहेत. जर तुम्हाला सातत्याने लघवी करताना त्रास होत असेल तर तुम्ही डाॅक्टरांच्या सल्ल्याने आपल्या लघवीची तपासणी करू शकता.
लघवीमध्ये पांढऱ्या रक्त पेशी, लाल रक्तपेशी, प्रथिने, ग्लुकोज आणि रसायनांचे प्रमाण शोधले जाते. जर लघवीमध्ये पांढऱ्या रक्त पेशी जास्त असतील तर ते मूत्रमार्गात संसर्ग दिसतो. याशिवाय युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन कोणत्या बॅक्टेरियामुळे होत आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर तुम्हाला युरिन कल्चर टेस्ट करायला सांगू शकतात. या चाचण्यांद्वारे आपण लघवी करताना वेदनांचे कारण शोधू शकता. यासंदर्भात आजतकने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.