देशभरात आर्थ्रायटिसच्या (Arthritis) रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून आता हा आकडा सुमारे 18 कोटी इतका झाला आहे. त्यापैकी 15 कोटी लोकांना गुडघेदुखीचा त्रास होत आहे. आर्थ्रायटिस या आजारात शरीरातील हाडं (bones) कमकुवत होतात. त्यामुळे लोकांना सांध्यांमध्ये वेदना, सूज येणे किंवा ते आखडणे असा त्रास सहन करावा लागतो. आज (12 ऑक्टोबर) जागतिक आर्थ्रायटिस दिवस (World Arthritis Day) 2022 च्या पार्श्वभूमीवर, हा आजार नक्की काय आहे व त्यामुळे काय नुकसान होऊ शकते, हे जाणून घेऊया.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, आर्थ्रायटिस या आजारात हाडांव्यतिरिक्त शरीराच्या इतर १४ अवयवांना हानी पोहोचवते. तसेच हाडांमध्ये ऑस्टिओपोरोसिस, स्नायूंमध्ये अशक्तपणा, पेशींचे नुकसान होणे, डोळ्यांमध्ये कोरडेपणा व लालसरपणा जाणवणे, रक्ताची कमतरता, न्यूमोनिया, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे, आता आर्थ्रायटिसचा त्रास हा तरुणांमध्येही सामान्य झाला असून 30 ते 40 या वयोगटातील लोकांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत.
कमी वयातच का होतो आर्थ्रायटिसचा त्रास ?
वैशाली मॅक्स रुग्णालयातील ऑर्थोपेडिक विभागाचे युनिट हेड आणि डायरेक्टर डॉ. अखिलेश यादव यांच्या सांगण्यानुसार, तरुणांमध्ये स्टेरॉइड आणि सप्लिमेंट्स घेण्याचा ट्रेंड लक्षणीय वाढला आहे. बॉडी बनवण्यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तसेच कॅल्शिअमची कमतरता आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळेसुद्धा ही समस्या वाढत आहे. याशिवाय एका जागी बराच वेळ बसणे, तसेच बसण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाची चुकीची पद्धत यांमुळेही तरुणांना सांधेदुखीचा त्रास होत आहे.
ओस्टिओ-आर्थ्रायटिसच्या प्रकरणांमध्येही होत आहे वाढ –
डॉ. यादव यांच्या सांगण्यानुसार, ओस्टिओ-आर्थ्रायटिसच्या प्रकरणांमध्येही वाढ होच आहे. ओस्टिओ-आर्थ्रायटिस हा आर्थ्रायटिसचाच एक प्रकार आहे. हा आजार वाढत्या वयानुसार होतो. मात्र त्याचेच एक दुसरे रुपही आहे ज्याला रूमेटॉयड आर्थ्रायटिस असे म्हटले जाते. हा आजार किंवा त्रास कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. या आजारात तुमची रोगप्रतिकारक शक्ती खूप सक्रिय होते. ज्यामुळे सांध्यांमध्ये सूज येते, तसेच सकाळी उठल्यावर सांध्यामध्ये कडकपणा जाणवतो आणि हाडांमध्येही खूप वेदना होतात.
का होतो सांधेदुखीचा त्रास ?
उठण्याची आणि बसण्याची चुकीची पद्धत, हे सांधेदुखीचे सर्वात मोठे कारण आहे, असे डॉ. अखिलेश यांनी नमूद केले. सांधेदुखी टाळायची असेल तर पाय वाकवून बसणे टाळा. कधीही जिममध्ये किंवा इतरत्र एकदम भारी वर्कआउट करू नका. तसेच आहाराची योग्य काळजी घ्या आणि ज्यामध्ये कॅल्शिअम असेल अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. तसेच धूम्रपान करणे टाळावे, ते आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते.