मुंबई : गेल्या काही वर्षांपासून भारत हा मधुमेहाची राजधानी बनला आहे. बदलती जीवनपध्दती, प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वापर, फास्टफूड (Fast food), कामाचे स्वरुप, व्यसन आदींमुळे दिवसेंदिवस भारताभोवती मधुमेहाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा असे घडते की तुम्हाला मधुमेह (Diabetes) आहे आणि तुम्हाला ते माहित देखील नसते. त्यामुळे मधुमेहाबाबत समजून घेणे तसेच इतरांना त्याच्या लक्षणांची जाणीव करून देणे, आवश्यक ठरते. मधुमेहाच्या 90 टक्के प्रकरणांमध्ये हा आजार होऊन बराच काळ लोटल्यानंतर हा आजार समजून येतो. मधुमेहात अशी कोणतीही चिंताजनक लक्षणं (Symptoms) नसतात, त्यामुळे त्याची लागण होताच त्याची माहिती आपल्याला समजत नाही. तुम्हाला जास्त भूक लागत असेल तर सावध व्हा, कारण तुम्हाला मधुमेह असू शकतो. मधुमेह हा एक छुपा आजार आहे, ज्याचा परिणाम हळूहळू शरीरावर होऊ लागतो, परंतु त्याची लक्षणे ओळखून त्याला लवकर प्रतिबंध करणे आवश्यक ठरते.
जास्त भूक लागणे
जर तुमची भूक वाढत असेल, जेवण केल्यानंतरही काही वेळातच तुम्हाला पुन्हा भूक लागत असेल, तर हे मधुमेहाच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. मधुमेहाचा रुग्ण जेव्हा कार्बोहायड्रेट घेतो तेव्हा त्याच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक झपाट्याने वाढते, पण जितक्या वेगाने वाढते तितक्या वेगाने ती कमी होते आणि लगेचच भूक लागते. त्यामुळे जर तुमची भूक सामान्यपेक्षा वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जास्त तहान लागणे
सतत आणि वारंवार तहान लागणे हे देखील मधुमेहाच्या लक्षणांपैकी एक आहे. साखर वाढल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासते, त्यामुळे वारंवार तहान लागते.
वारंवार लघवी होणे
जर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत असेल तर ती साखर लघवीद्वारे शरीरातून बाहेर काढण्यासाठी किडनीला अतिरिक्त काम करावे लागते. त्यामुळे वारंवार लघवी होते. जर तुमच्या लघवीची वारंवारता वाढत असेल तर ते साखर वाढल्याचे लक्षण असू शकते.
वजन वाढणे किंवा कमी होणे
वजन कमी करण्याचा कोणताही प्रयत्न न करता शरीराचे वजन अचानक कमी होणे किंवा वाढू लागणे हेसुध्दा मधुमेहाचे एक लक्षण आहे. अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सतत थकवा आणि अशक्तपणा
मधुमेह तुम्हाला आतून कमकुवत करतो. त्यामुळे जर तुम्हाला दीर्घकाळ थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल किंवा शरीरात उर्जेची कमतरता असेल तर ते मधुमेहाचे लक्षण असू शकते.
यीस्ट संसर्ग
मधुमेहाने ग्रस्त पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही गुप्तांगांमध्ये यीस्ट संसर्ग होण्याची शक्यता असते. मूत्रातील साखर यीस्ट वाढण्यास सर्वात अनुकूल जागा आहे. त्यामुळे महिलांना विशेषत: वारंवार योनीमार्गात संसर्ग होत असेल तर ते मधुमेहाचे लक्षण असू शकते.
संबंधित बातम्या