गेल्या काही दिवसांपासून भारतातील कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आली आहे. अनेक शहरेदेखील कोरोनामुक्त झाले आहे, असे वाटत असताना पुन्हा एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये लहान मुलांची कोरोनाबाधित प्रकरणं समोर येत आहेत. जागतिक स्तरावर कोरोना (Corona) संसर्गाच्या घटनांबरोबरच देशातील वाढत्या प्रकरणांमुळे आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. पालकांनी मुलांना शाळेत पाठवताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिल्ली (Delhi) एनसीआर शाळांमध्ये (ncr schools) वाढत्या संसर्गाची प्रकरणे इतर राज्यांसाठीही चिंताजनक ठरत आहेत, सर्व पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. या दिवसात मुलांना शाळेत पाठवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? याची माहिती या लेखातून घेणार आहोत.
कोरोना संसर्गाच्या धोक्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या एका गटाने लहान मुलांमध्ये कोविडच्या धोक्याबाबत मोठा खुलासा केला आहे. ‘जामा पेड्रीयाट्रीक्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात तज्ञांनी सांगितले, की ओमिक्रॉनने डेल्टाच्या तुलनेत 5 वर्षांखालील मुलांमध्ये संसर्गाच्या तीव्रतेचा धोका कमी असल्याचे आढळून आले आहे. जरी मुलांना संसर्ग झाला तरी त्यांच्यामध्ये रोगाचा गंभीर धोका कमी असल्याचे दिसून आले आहे. परंतु मुले संसर्गाचे वाहक म्हणून काम करु शकतात. म्हणून पालकांनी याबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
मुलांना शाळेत पाठवताना त्यांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपायांची सविस्तर माहिती देणे ही प्रत्येक पालकाची विशेष जबाबदारी आहे, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुलांना सोशल डिस्टन्सिंगची गरज आणि फायदे, हाताची स्वच्छता, शाळेत मास्क कसा घालायचा हे शिकवले पाहिजे. शाळा प्रशासनानेही मुलांमध्ये शारीरिक अंतर असावे आणि कोणत्याही प्रकारे कोरोनाचे संभाव्य धोके टाळता येतील याची काळजी घ्यावी, याबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की जर तुमच्या मुलाला सर्दी, खोकला, ताप किंवा कोरोना संसर्गाची कोणतीही संभाव्य लक्षणे असतील तर त्यांना शाळेत पाठवू नका. लक्षणांवर बारकाईने नजर ठेवा, समस्या वाढत गेल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. मुले स्वतःची काळजी घेऊ शकत नसल्यामुळे मास्क आणि हाताच्या स्वच्छतेबाबत पालकांनी मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्या मुलांना आधीच दमा आहे, श्वासोच्छवासाचा त्रास आहे किंवा रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्यांना कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये शाळेत पाठवू नका. अशा मुलांमध्ये संसर्गाचा धोका इतरांपेक्षा जास्त असू शकतो.
हेही वाचा:
गर्भधारणेतील ‘ही’ पाच लक्षणं आहेत अगदी सामान्य…असे होतात शारीरिक बदल
Health Care Tips : वाचा उष्माघात होण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय डाॅक्टरांकडूनच!