Bill Gates: ओमिक्रॉनला हलक्यात घेताय? बिल गेटस् यांचा अनुभव वाचलात का? सगळ्या सुट्ट्या कॅन्सल, महामारीचा शेवटही सांगितला

| Updated on: Dec 22, 2021 | 9:00 AM

सर्वात मोठी चिंतेची हीच गोष्ट आहे. कारण ओमिक्रॉन तुम्हाला नेमका किती आजारी पाडतो हे अजूनही कळत नाहीय. त्यामुळेच ओमिक्रॉनला हलक्यात घेणार असाल तर बिल गेटस यांचे चार पाच ट्विट एकदा वाचणं गरजेचं आहे.

Bill Gates: ओमिक्रॉनला हलक्यात घेताय? बिल गेटस् यांचा अनुभव वाचलात का? सगळ्या सुट्ट्या कॅन्सल, महामारीचा शेवटही सांगितला
ओमिक्रॉनच्या धोक्यावर सजग करणारे काही ट्विटस बिल गेटस यांनी केलेत.
Follow us on

महाराष्ट्रात एकाच दिवसात ओमिक्रॉनचे सर्वाधिक 11 रुग्ण सापडलेत. एकूण आकडा हा 65 वर आहे. रोज ओमिक्रॉनच्या रुग्णात भर पडतेय. देशपातळीवर रुग्णसंख्या झपाट्यानं वाढताना दिसतेय. त्या पार्श्वभूमीवर केंद्रानं राज्य सरकारला नाईट कर्फ्यू लावण्याचेही निर्देश दिलेत. म्हणजेच एकीकडे कोरोना हा थंडावलाय असं वाटत असतानाच ओमिक्रॉननं (Omicron) मात्र वेग पकडल्याचं दिसतंय. ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा तिप्पट वेगानं पसरतो असं आतापर्यंत तरी दिसून आलंय. पण तो किती घातक आहे यावर मात्र अजूनही चित्रं स्पष्ट होणं बाकी आहे. आणि बिल गेटस म्हणतात तसं, सर्वात मोठी चिंतेची हीच गोष्ट आहे. कारण ओमिक्रॉन तुम्हाला नेमका किती आजारी पाडतो हे अजूनही कळत नाहीय. त्यामुळेच ओमिक्रॉनला हलक्यात घेणार असाल तर बिल गेटस (Bill Gates Tweets) यांचे चार पाच ट्विट एकदा वाचणं गरजेचं आहे.

काय म्हणालेत बिल गेटस?
यूरोप, आफ्रिका, अमेरीकेत ओमिक्रॉनचा (Omicron wave in America) मोठा शिरकाव झालाय. त्या पार्श्वभूमीवर त्या त्या देशात निर्बंधही लावले जातायत. अमेरीकेतल्या स्थितीवर बिल गेटस यांनी काही ट्विट केलेत. त्यात ते म्हणतात, ज्यावेळेस असं वाटत होतं की आयुष्य आता नॉर्मल होईल नेमकं त्याच वेळेस कोरोनाची महामारी सर्वात धोकादायक स्थितीत पोहोचलीय. ओमिक्रॉन आपल्या सर्वांच्या घरात येईल, प्रत्येकाला त्याची लागण होईल. माझ्या जवळच्या मित्रांना त्याची लागण झालीय. मी माझे हॉलीडेचे सर्व प्लॅन कॅन्सल केलेत. त्या ट्विटला जोडून पुढं गेटस म्हणतात, जेवढ्या वेगानं ओमिक्रॉनचा विषाणू पसरतोय, तेवढ्या वेगानं इतिहासात कुठलाच विषाणू पसरलेला नव्हता. लवकरच हा जगातल्या प्रत्येक देशात असेल. गेटस् पुढच्या ट्विटमध्ये ओमिक्रॉनचा सर्वात धोकादायक पैलू मांडताना म्हणतात, सर्वात मोठा धोका काय तर ओमिक्रॉन तुम्हाला किती आजारी पाडतो हे माहितीच नसणं. जोपर्यंत आपल्याला त्याची संपूर्ण माहिती होत नाही, तोपर्यंत हे गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. डेल्टापेक्षा हा निम्माच घातक वाटत असला तरीसुद्धा आतापर्यंतची ही सर्वात मोठी लाट आहे. कारण ओमिक्रॉनची लागण वेगानं होतेय.


नेमकं काय केलं पाहिजे?
ओमिक्रॉनचा धोका एवढा मोठा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे तेही बिल गेटस ट्विटमध्ये सांगतात. दरम्यानच्या काळात आपण एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. मग कुणी खाली रस्त्यावर रहात असेल किंवा दुसऱ्या देशात. याचाच अर्थ असा की मास्क घालणे, इनडुअर गर्दी टाळणे, आणि महत्वाचं म्हणजे लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. सर्वात सुरक्षित पर्याय काय तर बुस्टर डोस घेणे. ज्यांना डोस दिलेले आहेत, त्यांनाही लागण होताना दिसतेय. ते चिंताजनक आहे. पण लस निर्मिती ही गंभीर आजारी होण्यापासून वाचण्यासाठी तसच मृत्यू टाळण्यासाठी केलेली आहे. आणि ते काम ती उत्तमपणे करतेय.


गूड न्यूज काय?
बिल गेटस काही आशावादी गोष्टीही सांगतायत. ते म्हणतात, इथं जर कुठली गूड न्यूज असेल तर ती हिच की, तो ज्या वेगानं पसरतो तो त्याच वेगानं ओसरतोही. म्हणजे ओमिक्रॉनची लाट ही एखाद्या देशात 3 महिन्यांपेक्षा कमी असू शकते. ते काही महिने वाईट असू शकतात. पण माझा अजूनही विश्वास आहे, जर आपण योग्य पावलं उचलली तर 2022 मध्ये ही महामारी संपेल. पुढं गेटस् असही म्हणतात की, हे खरंच निराशजनक आहे की आणखी एका हॉलिडेवर कोरोनाची सावली पडतेय. पण अशी स्थिती कायमची नसेल. कधी तरी ही महामारी संपेल. आणि आपण एकमेकांची काळजी घेतली तर ती वेळ लवकर येईल.

हे सुद्धा वाचा:

अमिताभ बच्चन, सलमान खानच नव्हे, तर ‘या’ बॉलिवूडकरांनीही घर भाडेतत्वावर देत केलीये बक्कळ कमाई!

Chandra Grahan 2022 | नवीन वर्षात दोनदा अनुभवा चंद्राच्या मोहक छटा, जाणून घ्या चंद्रग्रहणाच्या तारखा आणि वेळ

Best Chalo App | ऑनलाईन तिकीट बूकिंग ते लोकेशन ट्रेसिंग, बेस्ट बस होणार हायटेक