जास्त पाणी प्यायल्याने झाला ब्रूस ली चा मृत्यू ? जाणून घ्या एका दिवसात किती पाणी पिणे योग्य ?

| Updated on: Nov 24, 2022 | 2:00 PM

मार्शल आर्ट्सला जगभरात मान्यता मिळवून देणाऱ्या ब्रूस ली चा वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल 50 वर्षांनी त्याच्या मृत्यूचे कारण समोर येत असून जास्त पाणी प्यायल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

जास्त पाणी प्यायल्याने झाला ब्रूस ली चा मृत्यू ? जाणून घ्या एका दिवसात किती पाणी पिणे योग्य ?
Follow us on

नवी दिल्ली – पाणी पिणं हे आपल्या शरीरासाठी किती गरजेचं आहे, हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. चांगल्या व निरोगी आयुष्यासाठी जास्त पाणी (drinking water) पिण्याचा सल्ला लोकांना दिला जातो. कारण शरीरातील सर्व कार्ये सुरळीतपणे पार पडण्यासाठी पाण्याची गरज असते. आपल्या शरीरात 70 टक्के पाणी असते आणि अशा परिस्थितीत शरीरासाठी पाण्याचे महत्त्व अधिकच वाढते. केवळ शरीरातील अवयव योग्य ठेवण्यासाठीच नव्हे तर आपल्या त्वचेत ओलावा कायम राखण्यासाठी देखील पाणी आवश्यक असते. मात्र याच पाण्यामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का ? प्रसिद्ध मार्शल आर्ट लिजंड ब्रूस ली (bruce lee) याचा मृत्यू प्रमाणापेक्षा अधिक पाणी प्यायल्यामुळे (excess water) झाल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

संशोधनात करण्यात आला दावा

क्लिनिकल किडनी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, कदाचित ब्रुस ली यांचा मृत्यू जास्त पाणी प्यायल्यामुळे झाला असावा. 20 जुलै 1973 रोजी वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी ब्रूस ली यांचा मृत्यू झाला. जगभरात मार्शल आर्टला मान्यता मिळवून देण्याचे श्रेय ब्रूस ली यांना जाते. त्यांच्या मृत्यूसाठी डॉक्टरांनी वेदनाशामक औषधांना जबाबदार ठरवलं होतं. ब्रूस ली यांच्या मेंदूला सूज आली होती, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र अती पाणी प्यायल्याने त्यांचा मृत्यू झाला असे कारण वैज्ञानिकांनी 49 वर्षानंतर सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

वैज्ञानिकांनी मांडली ही थिअरी

तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की, वेदनाशामक औषध घेतल्यामुळे ब्रूस ली यांना सेरेब्रल एडेमा झाला होता, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, तब्बल 5 दशकांनंतर शास्त्रज्ञ आता असे सांगत आहेत की ब्रूस लीचा मृत्यू कोणत्याही औषधामुळे नव्हे तर बहुधा हायपोनाट्रेमियामुळे झाला असावा. जेव्हा जास्त पाणी प्यायल्यामुळे शरीरातील सोडिअमची पातळी कमी होते तेव्हा शरीरात हायपोनाट्रेमियाची परिस्थिती उद्भवते. यामध्ये पाण्याच्या असंतुलनामुळे शरीरातील पेशी आणि विशेषत: मेंदूला सूज येते. अती पाणी प्यायल्यामुळे ब्रूस ली च्या किडनीला इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.

ब्रूस लीचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या किडन्या खराब होत्या आणि त्यामुळेच ते जे पाणी पीत होते, ते फिल्टर झाले नाही, असेही शास्त्रज्ञांनी सांगितले. अशा परिस्थितीत त्याच्या शरीरात पाणी भरले होते. शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त झाल्याने ब्रूस लीचे निधन झाले.

हायपोनेट्रेमिया का होतो ?
सोडियम हे शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. सर्व अवयवांच्या स्नायूंचे योग्य पद्धतीने कार्य व्हावे यासाठी सोडिअम महत्त्वाची भूमिका बजावते. सोडिअम आपल्या शरीरातील पेशींभोवती एक असे वर्तुळ तयार करते ज्यामुळे त्यांचे कार्य योग्यरित्या होऊ शकेल. पण आपण जेव्हा गरजेपेक्षा जास्त पाणी पितो तेव्हा शरीरात असलेले सोडिअम अतिरिक्त पाण्याने विरघळते आणि लघवीद्वारे बाहेर येते. असे दीर्घकाळासाठी झाल्यास तर शरीरातील सोडिअमचे प्रमाण कमी होऊ लागते आणि ते योग्य प्रकारे काम करत नाही, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवालाही धोका निर्माण होतो. या स्थितीला हायपोनेट्रेमिया असे म्हटले जाते.

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ?

आपल्या शरीरासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. पण ज्याप्रमाणे कमी पाणी पिणं योग्य नाही त्याचप्रमाणे पाण्याचा अतिरेकही शरीरासाठी चांगला नाही. कमी पाणी प्यायल्याने शरीरात डिहायड्रेशन होते, ज्यामुळे डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे, अशक्तपणा, तोंड कोरडं पडणे, रक्तदाब कमी होणे, पायात सूज येणे, बद्धकोष्ठता अशा समस्या उद्भवू शकतात. त्याचबरोबर गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास अतिहायड्रेशनची परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता निर्माण होणे, उलट्या होणे, हाता-पायांचा रंग बदलणे, स्नायूंमध्ये पेटके येणे असा त्रास होऊ शकतो.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान दोन लिटर पाणी प्यावे, असा सल्ला डॉक्टर देतात. एखाद्या व्यक्तीने दररोज किती पाणी प्यावे हे त्याच्या शरीराच्या गरजेवर अवलंबून असते. एका अंदाजानुसार, महिलांसाठी दररोज 2.7 लिटर आणि पुरुषांसाठी 3.7 लिटर पाण्याची आवश्यकता असते.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)