औरंगाबाद: चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन नोव्हेंबर 2020 पासून बंद आहे. रुग्णालयातील हे मशीन तब्बल 1.80 कोटी रुपये किंमतीचे असून केवळ उंदराने वायर कुरतडल्यामुळे ते बंद पडल्याचे रविवारी समोर आले. ही माहिती कळताच औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना येथे पाहणी करण्यासाठी आलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. तसेच पेस्ट कंट्रोल करून येथील उंदरांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हे मशीन दुरुस्त करण्यासाठी 12 लाख रुपयांचा निधी लागणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सिटी स्कॅनची प्रचंड गरज असताना ते बंद राहिले, याबद्दल राजेश टोपे यांनी नाराजी व्यक्त केली.
उंदरांनी केबल कुरतडल्याने एवढे महत्त्वाचे मशीन सहा महिन्यांपासून बंद राहिले. ही बाब कळताच आरोग्यमंत्री राजेश टोपे चांगलेच संतापले. सिटी स्कॅन मशीन वर्षभरापासून बंद राहणे, हा खूप मोठा गुन्हा आहे. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांच्या काळातील हा प्रकार आहे. दुसऱ्या लाटेपूर्वीच मशीन दुरुस्ती होणे गरजेचे होते. जिल्हा शल्यचिकित्सक हे रुग्णालयाचे प्रमुख असतात. त्यांचे हे काम असते. त्यामुळे उंदरांचा बंदोबस्त त्वरीत करा. पेस्ट कंट्रोल करा, असे आदेश राजेश टोपे यांनी दिले. दरम्यान यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून दुरुस्तीसाठी निधी मिळणार असल्याचे डॉय मुरंबीकर यांनी सांगितले.
रविवारी रुग्णालयात झालेल्या बैठकीला सर्व प्रमुख अधिकारी उपस्थिती होते. यावेळी टोपे यांनी रुग्णालयातील समस्यांचा आढावा घेतला. तेव्हा रक्तपेढी नसल्याने घाटीत जावे लागते, सोनोग्राफी मशीन आहेत, पण त्यातून मोजक्याच सोनोग्राफी होतात. सर्जन्स आहेत, पण यंत्रसामग्रीअभावी शस्त्रक्रिया होत नाही. वेतन वेळेवर होत नाही, अशा बाबी डॉक्टरांनी टोपे यांच्यासमोर मांडल्या. या रुग्णालयात डायलिसीस मिशीन तातडीने आल्या पाहिजेत अशा सूचनाही टोपे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून दिल्या.
दरम्यान, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक हे आढावा बैठकीला गैरहजर राहिल्याने त्यांची बदली करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले.
इतर बातम्या-
रावसाहेब दानवेंमुळेच औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम रखडले, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप