जगभरात कॅन्सरचे (कर्करोग) प्रमाण वाढत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेनशन (WHO) नुसार, भारतात गेल्या दहा वर्षांत कॅन्सरच्या (cancer) रुग्णांमध्ये ३० टक्के वाढ झाली आहे. देशातील कॅन्सरग्रस्त रुग्णांमध्ये 10 पैकी 6 जणांचा मृत्यू (death) होतो. गेल्या काही वर्षांपासून या आजाराचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. आयसीएमआरने आपल्या अहवालात असे म्हटले आहे की, येत्या पाच वर्षांत देशातील कॅन्सर रुग्णांची संख्या 12 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. लहान वयातही या आजाराचे रुग्ण येत आहेत, ही चिंतेची बाब आहे.
या जीवघेण्या आजाराचे रुग्ण वाढण्यामागे चार प्रमुख कारणे आहेत. द लॅन्सेटच्या अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे की, कमी वयातच कॅन्सर होण्याची प्रमुख कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे बिघडलेली जीवनशैली होय. खराब जीवनशैलीमुळे प्रोस्टेट कॅन्सर, थायरॉइडचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरची प्रकरणे वेगाने वाढत आहे. वेळेवर न झोपण्याची सवय आणि शारीरिक हालचालींचा अभाव या कारणांमुळे हा आजार आणखी वाढत आहे. लोकांच्या जीवनातील मानसिक तणावही खूप वाढत आहे. 30 ते 50 या वयोगटातील लोकांमध्ये कॅन्सर झाल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी हा आजार वृद्ध नागरिकांमध्ये अधिक दिसून येत होता.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी –
कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे आणखी एक कारण म्हणजे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी. फास्ट फूड, जंक फूड आणि तळलेले, भाजलेले पदार्थ यांच्या वाढत्या ट्रेंडमुळे कॅन्सर होत आहे. मांस आणि प्लास्टिकच्या वेष्टनात ठेवलेले इतर पदार्थ जास्त खाल्ल्याने किंवा पाणी प्यायल्यानेही हा आजार बळावत चालला आहे. प्लास्टिकमध्ये धोकादायक रसायने असतात जी आपल्या आत जातात आणि कर्करोगास कारणीभूत ठरतात.
लठ्ठपणा –
वाढते वजन किंवा लठ्ठपणा हे कर्करोगाचे तिसरे प्रमुख कारण आहे. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. शरीरातील उच्च बीएमआय हा कॅन्सरला आमंत्रण देत आहे. अशावेळी शरीर तंदुरुस्त ठेवणे हे खूप गरजेचं आहे. जर बीएमआय वाढत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. एका दिवसात किमान अर्धा तास व्यायाम केलाच पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
धूम्रपान आणि मद्यपान –
हल्ली तरुणांमध्ये धूम्रपान आणि दारूचे पिण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक तरुणांना तर त्याचे व्यसनही जडले आहे. सिगारेटच्या अतिसेवनामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर होतो. तर मद्यपान केल्यामुळे यकृत आणि पोटाचा कॅन्सर होत असल्याची प्रकरणे नोंदवली जात आहेत.