नवी दिल्ली – भारतात दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन (Children’s Day) साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त हा दिवस साजरा केला जातो. लहान मुलांनाही विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. पण काही वेळा अशा परिस्थितीत पालक मुलांच्या त्वचेची (skin care) काळजी घ्यायला विसरतात. मुलांच्या त्वचेची काळजी घेणंही खूप गरजेचं असतं असं की, डॉक्टरांचं म्हणणं आहे. तसं न केल्यास त्यांना अनेक प्रकारच्या समस्या (problems) येऊ शकतात. मुलांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी कोणत्या पद्धतींचा अवलंब करावा हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
ॲलेंटिस हेल्थकेअर हॉस्पिटलमधील त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. चांदनी गुप्ता सांगतात की, त्वचा हा आपल्या शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे, त्यामुळे त्याच्या आरोग्याची काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. प्रखर ऊन अथवा सूर्य प्रकाश यापासून लहान मुलांच्या त्वचेचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. तसेच मुलांच्या त्वचेवर मॉयश्चरायजर किंवा इतर उत्पादनांचा अतिवापर करू नये. असे केल्याने त्यांच्या त्वचेला हानी पोहोचून त्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.
डॉ. चांदनी सांगतात की, मुलाच्या जन्माच्या पहिल्या वर्षी त्याच्या त्वचेची स्थिती वेगवेगळी असते. जर 100 डिग्री फॅ किंवा त्याहून अधिक ताप आला व त्यासह त्वचेवर पुरळ आले तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. अनेक वेळा असे दिसून येते की पालक यूट्यूब व इतर व्हिडीओज पाहून मुलांच्या त्वचेची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र असे केल्याने काही वेळेस नुकसानही होऊ शकते. मुलांच्या त्वचेची काळजी कशी घेता येईल, हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी डॉक्टरांनी काही पद्धती सांगितल्या आहेत.
1) मुलांना प्रखर उन्हापासून दूर ठेवावे
मुलांना जास्त वेळ उन्हात पाठवू नये. थंडीच्या दिवसातही त्यांना बाहेर नेल्यास उन्हापासून संरक्षण केले पाहिजे. 6 महिन्यांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना सनस्क्रीन लावू नये.
मुलांना शक्य तितके सावलीत ठेवावे. मुलांचे डोके व कान टोपीच्या सहाय्याने झाकावेत. मुलांना सैलसर व लांब बाह्यांचे कपडे तसेच पाय पूर्ण झाकणारे कपडे घालावेत. सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मुलांना शक्यतो उन्हात जाऊ देऊ नये.
2) कोरड्या त्वचेची घ्या काळजी
सर्व बाळांना मॉइश्चरायझर लावण्याची आवश्यकता नसते, असे डॉ. चांदनी यांनी स्पष्ट केले. जन्मानंतर पहिल्या काही आठवड्यांत बाळांच्या त्वचेवर डाग पडणे हे सामान्य आहे. त्यामुळे घाबरून जाऊ कामा नये. जर तुमच्या मुलाची त्वचा खूप कोरडी झाली असेल किंवा भेगा पडत असतील तर तुम्ही पेट्रोलिअम जेली-बेस्ड उत्पादनांचा वापर करू शकता. तसेच त्वचेवर मॉइश्चरायझिंग लोशन देखील लावू शकता. लहान मुलांसाठी मॉयश्चरायझर म्हणून ऑलिव्ह ऑईल, नारळाचे किंवा सूर्यफूलाच्या बियांचे तेल यासारख्या नैसर्गिक वनस्पती तेलांचा वापर करू शकता.
3) नारळाच्या तेलाने करा मालिश
तुमच्या लहान मुलाची त्वचा चांगली राखण्यासाठी व त्याचे पोषण व्हावे यासाठी त्यांना तेलाने मालिश करावे. यामुळे केवळ थर्मोर्ग्युलेशन सुधारत नाही तर मुलांचा विकास आणि न्यूरोडेव्हलपमेंट यावरही महत्त्वाचा परिणाम होतो. चांगल्या व योग्य तेलाची निवड केल्यास त्याची बाळाच्या त्वचेच्या विकासात खूप मदत होते. व्हर्जिन कोकोनट बेस्ड बेबी ऑईलचा वापर हा सर्वोत्तम असल्याचे अनेक अभ्यासांमध्ये नोंदवले गेले आहे.