मुंबई: नारळाचा वापर पूजेपासून ते खास प्रकारचे पदार्थ बनवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत केला जातो. खरं तर कच्चा नारळ देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. बरेच लोक नारळाच्या पाण्याचेही सेवन करतात. नारळाचे पाणी आरोग्यालाही असंख्य फायदे देते. त्याचप्रमाणे कच्चा नारळ खाल्ल्याने शरीराला तांबे, सेलेनियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक भरपूर प्रमाणात मिळते. इतकंच नाही तर नारळात काही प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि फोलेटदेखील आढळतं. चला तर मग जाणून घेऊया कच्च्या नारळाच्या सेवनाने शरीराला होणाऱ्या इतर फायद्यांविषयी…
जर तुम्ही वजन कमी करण्याच्या चिंतेत असाल आणि सकाळ-संध्याकाळ जिम करून वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर यामध्ये कच्चा नारळ फायदेशीर ठरू शकतो. आपण आपल्या आहारात स्नॅक म्हणून कच्च्या नारळाचा समावेश केला पाहिजे. ते खाल्ल्याने कोलेस्टेरॉल नॉर्मल होते. त्याचबरोबर चरबीही बर्न होते.
पावसाळ्यात केसांची स्थिती बिघडते. त्याचबरोबर कच्चा नारळ ही त्वचा टिकवून ठेवण्यातही चांगली भूमिका बजावतो. कच्चा नारळ खाल्ल्याने केस रेशमी आणि मुलायम होतात. याच्या सेवनाने त्वचेचा आतील भाग सुधारतो. हळूहळू चेहऱ्यावरील सुरकुत्याही लक्षणीय रित्या कमी होऊ लागतात. कच्च्या नारळात अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात.
ज्या लोकांना पोटाची समस्या आहे, त्यांनी कच्च्या नारळाचे सेवन सुरू करावे. खरं तर यात भरपूर फायबर असतं. याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. बद्धकोष्ठतेच्या समस्येमध्ये फायबर आहार घेतल्यास पोटाला आराम मिळतो. अशावेळी नारळाचे सेवन फायदेशीर ठरते.
शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कच्चा नारळ फायदेशीर ठरतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असणाऱ्यांनी हे खावे. नारळाच्या सेवनाने शरीराला अँटीवायरल गुणधर्म मिळतात. यामुळे शरीरातील इन्फेक्शन दूर होते. याशिवाय नारळात अँटीबॅक्टेरियल गुणधर्मही असतात.