मुंबई: कॉपर बॉटल! म्हणेजच तांब्याची बाटली. आजकाल तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायचं फार वेड आहे. जीवनशैली जरी बिघडली असली तरी आरोग्याची काळजी घेणारे लोक पण भरपूर आहेत. डाएट करणारे, योग्य ती काळजी घेणारे, व्यायाम करणारे अशा लोकांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे कॉपर बॉटल हा एक ट्रेंड आहे असं म्हणायला हरकत नाही. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती मजबूत होते. याशिवाय वजन कमी करणे, संधिवात, कोलेस्टेरॉल आणि हाय बीपीवरही हे पाणी फायदेशीर ठरते.
जर आपण दिवसभर तांब्याच्या बाटलीत किंवा भांड्यात साठवलेले पाणी पित असाल तर यात तांब्याच्या विषारीपणाचा धोका जास्त आहे. दिवसभर तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्यास तीव्र मळमळ, चक्कर येणे, ओटीपोटात दुखणे आणि यकृत आणि मूत्रपिंड निकामी होऊ शकते. जर जास्त प्रमाणात तांबे पाण्यात मिसळले गेले तर त्याचे आरोग्यावर संभाव्य दुष्परिणाम होऊ शकतात.
अनेकदा आरोग्याच्या फायद्यांसाठी आपण सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मध पितो पण तांब्याच्या ग्लासमधून पिणे पूर्णपणे टाळले पाहिजे. लिंबामध्ये आढळणारे आम्ल आणि तांबे याची प्रक्रिया होते. यामुळे पोटदुखी, पोटात गॅस आणि उलट्या देखील होऊ शकतात.
प्रत्येक वापरानंतर तांब्याची बाटली स्वच्छ पाण्याने धुवा. दर 30 दिवसांनी मीठ आणि लिंबू वापरून तांब्याची बाटली व्यवस्थित धुतली गेली पाहिजे. असे न केल्यास बाटलीवर ऑक्सिडेशनचे डाग पडतात. ऑक्सिडेशन डाग आला तर तांब्याच्या बाटलीचे फायदे कमी होतात.