बीजिंग: चीनच नव्हे तर जगभरात कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे 5.37 लाख रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 1396 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या 24 तासात चीनमध्ये नव्हे तर जपानमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेतही 50 हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे कोरोनामुळे चीनमध्ये हाहाकार उडालेलाच आहे. केवळ वेगाने कोरोनाची रुग्ण संख्याच वाढत नाहीये तर या महामारीमुळे लोकांचे प्राणही जात आहेत.
चीनमधील परिस्थिती सर्वाधिक वाईट आहे. रुग्णांना उपचार करण्यासाठी रुग्णालये उपलब्ध नाहीयेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही ही गोष्ट मान्य केली आहे. कोरोनाच्या नव्या लाटेमुळे चीनमधील रुग्णालये भरून गेली आहेत, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.
धोक्याची घंटा म्हणजे चीननंतर आता अमेरिका आणि जपानसहीत जगातील इतर देशातही कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार पाठोपाठ राज्यांनाही अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वर्ल्ड मीटर ही संस्था कोरोनातील आकडेवारींवर लक्ष ठेवते. त्यांच्या आकडेवारीनुसार जगात गेल्या 24 तासा 5.37 लाख रुग्ण आढळले आहेत. तर या महामारीमुळे 24 तासात 1396 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत जगभरात कोरोनाचे 659497698 रुग्ण आढळून आले आहेत. तर सध्या जगात 20 कोटी अॅक्टिव्ह केसेस आहेत.
जपानमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 2.6 लाख रुग्ण सापडले आहेत. तर 296 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात जगात जपानमध्ये सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासात अमेरिकेत 50 हजार रुग्ण आढळले आहेत. तर 323 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय दक्षिण कोरियामध्ये 88,172, फ्रान्समध्ये 54,613 आणि ब्राझिलमध्ये 44415 रुग्ण सापडले आहेत. ब्राझिलमध्ये 197 लोकांचा मृत्यू झाला आहे.
भारतात गेल्या 24 तासात 145 केसेस आढळून आल्या आहेत. मात्र, कोरोनामुळे भारतात अद्याप कुणाचाही मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत देशात 44,677,594 रुग्ण आढळलेले आहेत.
आतापर्यंत भारतात 5.3 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या केवळ 4672 एवढी आहे.
चीनमधील अधिकृत आकडेवारीनुसार चीनमध्ये बुधवारी 3,030 रुग्ण आढळले आहेत. मात्र, बुधवारी चीनमध्ये कुणाचाही मृत्यू झालेला नाही. मंगळवारी चीनमध्ये कोरोनामुळे पाच लोकांचा मृत्यू झाला होता. चीनमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याचं प्रशासन सांगत आहे.
मात्र, लोकांकडून जे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत, त्यावरून चीनमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं दिसत आहे.