नवी दिल्ली : कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाचं संकट कमी झाल्याचं चित्र असतानाच जगभरातून चिंता वाढवणारी बातमी येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाची सुरुवात जिथून मोठ्या प्रमाणावर सुरु झाली त्या चीनमध्ये (China) कोरोना रुग्णसंख्या वाढू लागलीय. फक्त चीन नाही तर हाँगकाँगमध्येही रुग्ण वाढत आहेत. जगातील इतर देशांमध्येही कोरोना रुग्णसंख्या वाढीस लागलीय, या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं जगभरात Deltacron चे रुग्ण वाढू लागल्याचं म्हटलंय. डेल्टाक्रॉन वेरिएंट कोरोना संसर्गाची आणखी लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. डेल्टाक्रॉन हा वेरिएंट कोरोना विषाणूच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन वेरिएंटमधून निर्माण झाल्याचं म्हटलं जातंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार फ्रान्स, यूके, नेदरलँड, डेन्मार्क आणि यूरोपच्या काही देशांमध्ये डेल्टाक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. तर, अमेरिकेतील काही भागात देखील या वेरिएंटचे रुग्ण आढळल्याचं समोर आलंय. मात्र, या रुग्णांची संख्या कमी आहे.
डेल्टाक्रॉन हा नवा वेरिएंट कोरोना विषाणूच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन वेरिएंटच्या एकत्रीकरणातून बनला आहे. शास्त्रज्ञांच्या मतानुसार यामध्ये डेल्टाचं ताकदवर असून ओमिक्रॉनची लक्षणं आढळतात. दोन्ही वेरिएंटच्या एकत्रीकरणामुळं या वेरिएंटला डेल्टाक्रॉन हे नाव देण्यात आलं आहे. वैज्ञानिकांच्या मते विषाणूचं म्यूटेशन होतं त्यावेळी अशा प्रकारचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. एक व्यक्ती एकाच वेळी दोन्ही वेरिएंटनं संसर्गित होतो.
डेल्टाक्रॉन हा वेरिएंट ओमिक्रॉन पेक्षा धोकादायक आहे की नाही यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. यापूर्वी आलेला डेल्टा वेरिएंट हा अधिक धोकादायक होता तर ओमिक्रॉन हा अधिक संक्रामक होता. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर लोक संक्रमित झाले होते. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते एखाद्या विषाणूच्या वेरिएंटच्या कॉम्बिनेशनची ही पहिली वेळ नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या सौम्या स्वामिनाथन यांनी आपण कोरोना विषाणूचे अनेक वेरिएंट समोर आल्याचं पाहिलं होतं.आपल्याला अधिक माहिती मिळवण्यासाठी वाट पाहावी लागेल, असं त्या म्हणाल्या.
जानेवारी महिन्यात सायप्रस येथील वैज्ञानिकांनी डेल्टाक्रॉनसंदर्भात माहिती दिली होती. सायप्रसचे वैज्ञानिक डॉ. लियोनडिओस कोस्त्रिकिस यांनी ही माहिती दिली होती. आता जागतिक आरोग्य संघटनेनं देखील डेल्टाक्रॉन वेरिएंट संदर्भात सूचना दिल्या आहेत.
इतर बातम्या: