मुंबई: पावसाळ्यात आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. काय खायला हवं, काय नाही याची काळजी घ्यावी लागते. बदलत्या हवामानासोबत आपल्याला आपला आहार सुद्धा बदलावा लागतो. हवामान बदललं की आजार वाढतात, रोगराई पसरते. सध्या भारतातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. आज आम्ही तुम्हाला या ऋतूत कोणत्या 4 गोष्टींचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया अशा 4 गोष्टी ज्या पावसाळ्यात खाल्ल्या तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं किंवा तुम्ही आजारीही पडू शकता.
पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांपासून दूर राहावे. या भाज्या खाताना सुद्धा भाजी बनविण्याआधी या नीट धुवून घ्याव्यात. पावसाळ्यात या भाज्यांमध्ये किडे वाढण्याचा धोका असतो, ज्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पालेभाज्या विशेषतः टाळाव्यात.
ज्यांना मांसाहाराची आवड आहे त्यांनी या ऋतूत खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. पावसाळ्यात व्यक्तीची पचनशक्ती कमकुवत असते आणि मांसाहारी अन्न पचविण्यासाठी तुमची पचनशक्ती मजबूत असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे अशा हवामानात मांसाहारी पदार्थांचे सेवन न केल्यास उत्तम.
पावसाळ्यात तळलेले पदार्थ खाणे टाळावे. या ऋतूत तळलेले अन्न लवकर पचत नाही, ज्यामुळे आपल्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. यासोबतच मसालेदार पदार्थांचेही कमीत कमी सेवन करावे.
पावसाच्या या ऋतूत दह्याचे सेवन शक्यतो टाळावे, असे डॉक्टरांचे मत आहे. दहीमध्ये बॅक्टेरिया असतात, ज्याचा या ऋतूत तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या ऋतूत शक्यतो दह्याचे सेवन करू नये.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)