नवी दिल्ली: आई होणे, हे जगातील प्रत्येक महिलेसाठी आनंदाची गोष्ट असते. गर्भारपणात (Pregnancy care) योग्य काळजी घेणे हे आई व बाळ, दोघांच्या तब्येतीसाठी चांगले असते. चौरस आहार, पुरेसा व्यायाम, चांगले वाचन आणि शांत मन या चारही गोष्टींचे पालन केल्यास गर्भारपणात फारसा त्रासही होत नाही आणि तो काळ आनंदात व्यतीत करता येतो. मात्र गर्भारपणात महिलेने काय खावे, काय खाऊ नये (food) या विषयी मत-मतांतरे आहेत. आपली आई- आजी, आजूबाजूच्या अनुभवी स्त्रिया वेगवेगळे सल्ले देत असतात. त्यामुळे गोंधळून जाऊ नका. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने डाएट चार्ट (diet chart) बनवून त्याचे पालन करू शकता. पौष्टिक आणि चौरस आहार केल्याने बाळाचे वजन चांगले वाढते व त्याच्या भविष्याच्या दृष्टीनेही ते फायदेशीर ठरते. मात्र गर्भारपणात जास्त उष्ण , तिखट पदार्थ टाळावेत. या काळात काही पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा अन्यथा आई व बाळाच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो.
1) कच्ची पपई – गर्भवती स्त्रियांनी या काळात चुकूनही कच्ची पपई खाऊ नये. पपई ही उष्ण असते. त्यामध्ये लेटेक्स असते. गर्भारपणाच्या सुरूवातीच्या काळात पपईचे सेवन केल्यास गर्भपाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे गर्भारपणात स्त्रियांनी पपई खाणे टाळावे.
2) अननस – अननस हे अतिशय चविष्ट फळ. थोडं आंबट , थोडं गोड असं हे फळ सगळ्यांनाच आवडतं. मात्र प्रेग्नन्सीदरम्यान महिलांनी अननस खाऊ नये. अननसात ब्रोमेलिन हा घटक असतो. ज्यामुळे दिलेल्या तारखेपूर्वीच प्रसूती होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी अननस खाणे टाळावे.
3) तुळस – तुळस ही औषधी गुणधर्मांनी भरपूर. पूजेत आपण तुळस वापरतो, तसेच जेवणातही नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीचे पान ठेवतोच. सर्दी, खोकला झाल्यास तुळशीच्या पानांचा काढा पिऊन लगेच आराम मिळतो. मात्र हीच तुळस गर्भवती स्त्रियांसाठी धोकादायक ठरू शकते. तुळशीच्या पानांमध्ये ॲस्ट्रोगोल नावाचे तत्व असते. ते पोटात गेल्यास गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळेच गर्भवती स्त्रियांनी तुळशीची पाने खाऊ नये, असे सांगितले जाते.
4) द्राक्षे – आंबट- गोड चवीची द्राक्षं सर्वांनाच आवडतात. पण प्रेग्नन्सीदरम्यान स्त्रियांनी द्राक्षांचे जास्त सेवन करू नये. जास्त प्रमाणात द्राक्षं खाल्ल्यास दिलेल्या तारखेपूर्वीच, लवकर डिलीव्हरी होण्याचा धोका असतो. जर तुम्ही ( गर्भारपणाच्या) पहिल्या ट्रेमिस्टरमध्ये ( पहिले तीन महिने) तर जास्त द्राक्ष खाऊ नका. ते आई व बाळ या दोघांच्या तब्येतीसाठी घातक ठरू शकते.
( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )