आजचं धावपळीचं जग आणि व्यस्त दिनक्रम यामध्ये अनेक जण सकाळी नाश्ता करणं टाळतात. वजन कमी (Weight Loss) करण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीही पोटात कमी कॅलरी जातील असा विचार करून नाश्ता करत नाहीत. मात्र नाश्ता न करण्याची (skipping breakfast) ही सवय शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. सकाळचा नाश्ता किंवा न्याहरी ही आपल्या निरोगी आयुष्यासाठी (health) महत्वपूर्ण आहे. सकाळी केलेला नाश्ता दिवसभरासाठी उर्जा देतो. कामाच्या व्यापात दुपारी, जेवणाची वेळ पाळली जातेच असं नाही. त्यामुळे भूक लागून डोकं दुखणं किंवा बराच वेळ उपाशी राहिल्याने ॲसिडिटी, जळजळ यासारखे त्रास होऊ शकतात. पण सकाळी पोटभर नाश्ता केल्यास अख्ख्या दिवसाची उर्जा तर मिळतेच पण ॲसिडिटीपासूनही बचाव होतो. सकाळची न्याहरी न केल्यास आरोग्यावर तसेच हृदयावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, दिवसभर काम करण्यासाठी उर्जेचा उत्तम स्त्रोत म्हणजे नाश्ता. सकाळचा नाश्ता हा पोटभरीचा तसेच पौष्टिक असावा. यामुळे वजन नियंत्रित राहते तसेच शरीराला पर्याप्त प्रमाणात उर्जाही मिळते. तसेच सकाळी लवकर न्याहरी केल्यास पचनासंबंधित फायदेही शरीराला होतात. न्याहरी करताना प्रथिन, साखर व कर्बोदके यांचे प्रमाण संतुलित असावे. नाश्ता करताना त्यात दूध, फळे यांचाही समावेश करावा.