वाढत्या वयानुसार शरीरात अनेक बदल व समस्या निर्माण होऊ लागतात. मधुमेह (Diabetes), थकवा, अशक्तपणा आदींचा त्यात समावेश आहे. या सोबतच गुडघेदुखीची समस्यादेखील सामान्य झाली आहे. चुकीची बसण्याची पद्धत, सांधेदुखी, बर्सायटिस, लठ्ठपणा, फ्रॅक्चर आदींमुळे गुडघेदुखीची समस्याही प्रौढांसह तरुणांमध्ये दिसून येत आहे. गुडघेदुखी (knee pain) कमी करण्यासाठी लोक विविध उपाय करतात. शेवटी त्रास कमी होत नसल्याने क्नी ट्रान्सप्लांटदेखील करण्याची वेळ येत असते. परंतु ही खूपच खर्चीक बाब असल्याने प्रत्येक रुग्णाला ते करणे शक्य होत नसते. त्यामुळे त्रास सहन करण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीही नसते. दरम्यान, गुडघेदुखीचा त्रास असलेल्यांसाठी एक महत्वाचा अभ्यास (study) समोर आला आहे. त्यानुसार एका झाडाच्या पानांचा अर्क गुडघेदुखीमध्ये खूप परिणामकारक ठरु शकतो.
हे संशोधन स्विस शास्त्रज्ञांनी केले आहे. संशोधनानुसार, ‘ऑलिव्ह’ किंवा ‘ऑलिव्ह ट्री’च्या पानांचा अर्क वेदनाशामक म्हणून काम करू शकतो. ऑलिव्हच्या झाडाच्या पानांमध्ये खूप चांगली गुणधर्म आढळतात, त्याला वैद्यकीय भाषेत ‘पॉलिफेनॉल्स’ म्हणतात. त्यात ‘ॲंटी-इंफ्लामेंट्री’ गुणधर्म आहेत आणि तीव्र सांधेदुखी असलेल्या रुग्णांमध्ये दुखण्याचा त्रास कमी करण्यास ते प्रभावी ठरत असतात. संशोधनानुसार, ऑलिव्ह ऑइल धमन्यांमध्ये चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते. त्यामुळे हृदयाचेही रक्षण होते. या व्यतिरिक्त, हे स्तनाचा कर्करोग, अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि नैराश्याचा धोकाही कमी करण्यास मदत करते.
‘मस्कुलोस्केलेटल डिसीज जर्नल थेरप्यूटिक अॅडव्हान्सेस’मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात 55 आणि त्याहून अधिक वयाच्या 124 लोकांचा समावेश होता. या संशोधनाचे नेतृत्व स्विस अस्थी शास्त्रज्ञ मेरी नोले होर्कजादा यांनी केले. 24 लोकांपैकी, पुरुष आणि स्त्रिया दोघेही समान संख्येत होते आणि त्यापैकी निम्म्याहून अधिक वजन जास्त होते. त्यापैकी 62 जणांना 125 मिग्रॅ ऑलिव्ह लीफ अर्क गोळ्याच्या स्वरूपात दिवसातून दोनदा देण्यात आला आणि अर्ध्यांना प्लेसबो देण्यात आले. 6 महिन्यांनंतर, गुडघा दुखापत आणि ऑस्टियोआर्थराइटिस आउटकम स्कोर KOOS च्या आधारावर त्यांच्या वेदनांची चाचणी घेण्यात आली. KOOS स्कोअर जितका जास्त असेल तितका त्रास कमी होणार होता. निष्कर्षात असे आढळून आले, की ज्या लोकांनी ऑलिव्हच्या पानांचा अर्क घेतला त्यांचा KOOS स्कोअर सुमारे 65 होता, तर प्लेसबो घेणाऱ्यांचा स्कोअर सुमारे 60 होता. संशोधकांच्या मते, पूरक आहार गुडघेदुखी कमी करू शकतो. प्राचीन ग्रीसपासून नैसर्गिक उपचारांमध्ये ऑलिव्हच्या पानांचा वापर केला जात आहे. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ऑलिव्हच्या पानांचा वापर करत असत.
(टीप : सदर मजकूर उपलब्ध माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे. कृपया याला कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.)
इतर बातम्या:
राज ठाकरेंच्या आदेशानं मनसेचा मेगा प्लान, तिथीप्रमाणं शिवजयंती साजरी करण्यासाठी जंगी तयारी