मुंबई : अयान नावाच्या मुलासोबत एक वेगळाच प्रकार घडला आहे. या मुलाचे वय पाच वर्षे असले तरी त्याची सामजिक परिपक्वता ही एका वर्षाच्या मुलासारखी आहे. अयान अजूनही बोलू शकत नाही. विशेष म्हणजे अनेकदा तो स्वत:च्याच जगात हरवलेला असतो. तीन वर्षांचा असल्यापासूनच अयान असा आहे. अशीच स्थिती सध्या अनेक मुलांची आहे.
शाळेत गेल्यावर त्याची विचित्र वागणूक कमी होईल असं त्याच्या पालकांना वाटलं होतं. पण करोना महासाथ आणि त्यापाठोपाठच्या टाळेबंदीमुळे अयानला प्रदीर्घ काळ घरातच बसून रहावं लागलं. याच कारणामुळे अयानची चीडचीड वाढली होती. त्याचे पालकही हैराण झाले आहेत. ऑनलाईन वर्गांना बसण्यास अयान नाखूष असल्यामुळे बालवयात त्याच्यावर जे उपचार-थेरपी करणे शक्य होते, ते न झाल्यामुळे पाच वर्षांचा होऊनही अयानची सामाजिक परिपक्वता एक वर्ष सात महिन्यांच्या बालकाइतकीच राहिली आहे.
अयानबाबत जे घडलं आहे तेच असंख्य स्वमग्न मुलांसोबत घडलेलं आहे. कोरोना महासाथ आणि टाळेबंदीमुळे या मुलांना अत्यंत महत्त्वाची असलेली थेरपी, उपचारपद्धतीला मुकावं लागलं. अनेक स्वमग्न मुलं तर अशी आहेत. सातत्यपूर्ण थेरपीमुळे त्यांच्यात अत्यंत सकारात्मक बदल दिसू लागले होते. कोरोनामुळे जास्त दिवस घरी राहिल्यामुळे अनेक मुले आत्ममग्न झाली आहेत.
याच आत्ममग्नतेवर बोलताना “घरातच राहिल्याने आणि अतिकाळजी करण्याच्या पालकांच्या स्वभावामुळे अनेक मुलांमध्ये वागणुकीच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. काही मुलं तर घरात चीडचीड, त्रागा करु लागली आहेत. विशेष मुलांच्या मानसिक विकासप्रक्रियेतील सुवर्ण कालखंड करोना महासाथीने हिरावून घेतल्याची भावना पालकांमध्ये निर्माण झाली आहे”, अशी माहिती ‘चाईल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’चे बालरोगतज्ज्ञ व ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. सुमित शिंदे यांनी दिली.
डॉ. सुमीत शिंदे पुढे म्हणाले, “स्वमग्नता ही एक जन्मस्थ न्यूरोलॉजिकल मनोवस्था आहे. यामध्ये मुलांची समाजात मिसळण्याची क्षमता, संवाद आणि वागणूक सामान्य मुलांसारखी नसते. समाजात मिसळण्यासाठी अशा विशेष मुलांना सातत्यपूर्ण उत्तेजना आणि समुपदेशन तसंच प्रशिक्षणाची गरज असते. करोना टाळेबंदीमुळे एक ते तीन वर्षांची बालकं आणि तीन ते सहा वर्षांची प्री-स्कूलमधील काही मुलांच्या मानसिक विकास कार्यक्रमात अडथळे निर्माण झाले.
गेल्या दीड वर्षात काही मुलांमध्ये निर्माण झालेल्या समस्या-
1. करोना, टाळेबंदी आणि बाहेर पडण्याच्या भीतीमुळे विशेष- स्वमग्न मुलांना घराच्या चार भिंतीतच प्रदीर्घ काळ रहावं लागलं. यामुळे त्यांना नियमित थेरपी-उपचार- समुपदेशन उपलब्ध झाले नाही.
2. घरातच अडकून पडल्यामुळे विशेष मुलांची समाजात मिसळण्याची सवय तुटली. आजूबाजूचे लोक, सामान्य समवयीन मुलं यांचा सहवास त्यांना लाभला नाही. त्यामुळे समाजात मिसळण्याची त्यांची क्षमता विकसित झाली नाही.
3. स्वगम्न तसंच मानसिक विकास-वाढीची समस्या असलेल्या विशेष मुलांसाठी खुले सामाजित वातावरण सर्वात महत्वाचे असते. या वातावरणाला ही मुलं मुकली.
4. सर्वसामान्य लहान मुलांनी कोविड काळात जरी आनलाईन अभ्यास केला असला तरी स्वमग्न मुलांसाठी अशा प्रकारे शिक्षण घेणं खूप कठीण, त्रासदायक आहे. आॅनलाईन वर्गांसाठीची पुरेशी मानसिक क्षमता नसल्यामुळे स्वमग्न मुलांचे गेल्या एक-दीड वर्षांत शैक्षणिक नुकसानही झाले, असंही डाॅ. सुमीत शिंदे यांनी सांगितलं
इतर बातम्या :
आमदार अशोक पवार यांना भर चौकात जीवे मारण्याची धमकी, निनावी पत्रामुळे खळबळ
लसीकरण कॅम्प आणि बॅनरबाजीवरून शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपली; महापौरांच्या दालनातच राष्ट्रवादीचा गोंधळ
(due to corona and lockdown narcissistic children increased)