नवी दिल्ली – जर तुम्हालाही फास्ट फूड अथवा जंक फूड (Junk food) खायची आवड असेल तर आजच सावध व्हा. कारण बऱ्याच काळापर्यंत पिझ्झा, बर्गर, बिस्किट्स , कोल्ड-ड्रिंक्स आणि विविध प्रकारचे अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ (ultra-processed food) खाल्ल्याने आतड्याचा कॅन्सर (cancer) व्हायचा धोका असतो. हा आजार कौटुंबिक इतिहास, वाढते वय आणि खराब जीवनशैली यांच्याशी निगडीत आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले की, एखाद्या व्यक्तीची जीवनशैली बऱ्याच कालावधीपर्यंत खराब असेल तर त्या व्यक्तीला हा आजार ( कॅन्सर) होऊ शकतो.
अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नपदार्थांचे सेवन करणाऱ्या 29 टक्के पुरुषांना हा आजार होण्याची शक्यता असते, असे या संशोधनात आढळून आले. तर ज्या महिला जास्त प्रमाणात रेडी टू इट फूडचे सेवन करतात त्यांना आतड्यांच्या कॅन्सरचा धोका 17 टक्के वाढल्याचेही शास्त्रज्ञांना आढळले.
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड म्हणजे काय ? त्यापासून कॅन्सरचा धोका कसा ?
अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ त्यांना म्हणतात, ज्या पदार्थांमध्ये असे घटक असतात जे आपण सामान्यत: घरी स्वयंपाक करताना वापरत नाही. उदाहरणार्थ, केमिकल्स आणि स्वीटनर, ज्यामुळे शरीराचे बरेच नुकसान होते. अल्ट्रा प्रोसेस्ड आणि प्रोसेस्ड फूडमध्ये फरक आहे. प्रक्रिया केलेल्या म्हणजेच प्रोसेस्ड फूडमध्ये गरम करणे, गोठविणे, डायसिंग, रसाळ अन्न यांचा समावेश होतो. प्रक्रिया केलेले अन्न आपल्यासाठी इतके हानिकारक ठरत नाही.
सामान्य स्तरावर खाल्ले जाणारे कॉमन अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ :
– इन्स्टंट नूडल्स व सूप
– रेडी टू ईट पदार्थ
– पॅक्ड स्नॅक्स
– कोल्ड ड्रिंक्स
– केक, बिस्किट्स , मिठाई
– पिझ्झा, पास्ता, बर्गर
हे पदार्थ स्वस्त असतात आणि ते शोधणे सोपे आहे, पण त्यामध्ये भरपूर कॅलरीज असतात. यामुळे तुम्ही नेहमीच्या भुकेपेक्षा जास्त खाता आणि मग वजनही वाढू लागतं. अल्ट्रा प्रोसेस्ड फूड हा पाश्चिमात्य जीवनशैलीतील सामान्य भाग आहे. सुमारे 23,000 लोकांवर करण्यात आलेल्या आणखी एका संशोधनात शास्त्रज्ञांना असे आढळले की, जे लोक अनहेल्दी डाएट व अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचे सेवन करतात त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थ दूरच ठेवावेत, असे शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.
असे ठेवा अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ दूर –
ब्राझीलमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड हे सामान्य आहे आणि इच्छा असूनही ते टाळता येत नाही, अशी एक समजूत आहे. पण प्रत्यक्षात हे चुकीचे आहे. खरं तर, कोणत्याही प्रकारच्या डाएटमध्ये अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडची आवश्यकता नसते. लोक फक्त त्यांची सोय आणि चवीसाठी डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश करतात.
बहुतांश अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांमध्ये भरपूर चरबी, साखर आणि मीठ असते. मात्र आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे फायबर आणि पोषक तत्वं यांचा अशा पदार्थांमध्ये अभाव असतो. तुम्हालाही असे अनहेल्दी पदार्थ खाणं टाळायचं असेल त्यासाठी निश्चय करून कठोर डाएट करावे लागेल. आपल्या आरोग्यास फायदा होईल अशाच अन्न पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
घातक अशा अल्ट्रा-प्रोसेस्टड पदार्थांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे सरकारचे धोरण होय. त्यामध्ये अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांचे उत्पादन, सेवन आणि ते खाण्यास दिले जाणारे प्रोत्साहन कमी करण्यासाठी पावले उचलली जातील. तसेच, लोकांना निरोगी व पोषक आहार खाण्यासाठी प्रेरित केले पाहिजे.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)