मुंबई: शरीराला डिटॉक्स करण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळी. त्यामुळे या वेळी भरपूर पाणी प्यावे. त्याचबरोबर सकाळी फळे खाणे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्यास ते आरोग्यासाठी खूप चांगले असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. पपई आपल्याला दिवसभर ऊर्जा देण्याचे काम करते. तसेही सकाळच्या नाश्त्यात हेल्दी खाद्यपदार्थांचा समावेश केल्यास दिवसभर ऊर्जावान असल्यासारखे वाटते.
पपई हे केवळ चवीच्या दृष्टीनेच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर फळ आहे. पपईमध्ये फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. तसेच व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई भरपूर प्रमाणात असते. इतकंच नाही तर पपईमध्ये ल्युटिन आणि झेक्सॅन्थिन कॅरोटीनोईड्स सारखे घटकदेखील आढळतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. चला तर मग जाणून घेऊया रिकाम्या पोटी पपई खाण्याचे फायदे…
वजन कमी करण्यासाठी पपई खूप प्रभावी आहे हे तुम्हाला माहित नसेल. जे लोक बऱ्याच काळापासून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी नाश्त्यात पपई खावी. खरं तर पपईमध्ये कॅलरीजचं प्रमाण खूपच कमी असतं. तसेच फायबर मुबलक प्रमाणात असते. पपई खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
पपई हे एक असे फळ आहे जे व्हिटॅमिन सी सह अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. त्यामुळे रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे त्वचेसाठी देखील खूप आरोग्यदायी आहे. याशिवाय शरीर डिटॉक्सही होते.
ज्यांचे कोलेस्टेरॉल वाढले आहे किंवा ज्यांना मधुमेह, हृदयरोग आणि लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे त्यांच्यासाठी पपई खूप फायदेशीर ठरू शकते. दररोज रिकाम्या पोटी पपईचे सेवन करावे. कारण यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते. रक्तदाबाच्या रुग्णांसाठीही पपई फायदेशीर मानली जाते.
रोज सकाळी उठून नाश्त्यात रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास पचनसंस्था मजबूत होईल. पपईमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने नेहमी खाल्ल्यानंतर ते खा. इतकंच नाही तर बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळेल. तसेच तुमचे पोट नियमित पणे स्वच्छ होईल.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)