मुंबई : आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. आंबा (Mango) जवळपास सर्वांनाच खायला प्रचंड आवडतो. सकाळ असो किंवा संध्याकाळ कोणत्याही वेळी आंबा खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आंब्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, फायबर, जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि ई सारखी अनेक पोषक तत्त्वे (Nutrients) असतात. यामुळे आंबा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, कोणत्याच गोष्टीचा अतिरेक व्हायला नको. कारण उन्हाळ्याच्या हंगामामध्येच आंबा मिळत असल्यामुळे दिवसभर आंबा खाण्यावर अधिक लोकांचा भर असतो. पण तुम्ही जर अतिप्रमाणात आंब्याचे सेवन करत असाल तर ते आरोग्यासाठी हानिकारक (Harmful) आहे. चला तर मग जाणून घेऊयात, जास्त प्रमाणात आंबा खाण्याचे परिणाम.
मधुमेहाच्या रूग्णांनी आंब्याचे सेवन करताना विचार करावा. मधुमेहाच्या रूग्णांनी आंब्याचे अतिसेवन केले तर ते त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते. आंब्यामध्ये नैसर्गिक साखर असते. हे जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मधुमेहाच्या रूग्णांनी रात्रीच्या वेळी अजिबात आंब्याचे सेवन करू नये.
आंब्यामध्ये कॅलरीज जास्त असतात, त्याच्या मर्यादेपेक्षा जास्त खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे त्यांनी आंबा खाणे टाळावे. तुम्ही खात असलात तरीही पुरेसा वर्कआउट नक्कीच करा जेणेकरून तुमच्या अतिरिक्त कॅलरीज बर्न होऊ शकतील. मात्र, वजन कमी करणाऱ्यांनी आंबा खाणे टाळाच. कारण आंब्यामुळे वजन झपाट्याने वाढते.
आंब्यामध्ये भरपूर फायबर असते. फायबर तुमच्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. पण जर तुम्ही याचे जास्त सेवन केले तर या फायबरमुळे तुम्हाला जुलाब होऊ शकतात. त्यामुळे आंबा खाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा. तसेच आंब्यामध्ये उष्णता असते. यामुळे चेहऱ्यावर मुरूम येण्याची शक्यता असते. जर तुम्ही आंब्याचे जास्त सेवन केले तर त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम येण्यास सुरूवात होते.