नवी दिल्ली: तुम्ही जर केसगळतीमुळे (hair fall) त्रस्त असाल, त्वचेची समस्या असेल किंवा सकाळी उठताच तुमच्या डोळ्यांना सूज येत असेल तर या सर्वांवर एक उपाय आहे. खरंतर काही घरगुती उपायांनी या सर्व समस्या दूर करता येऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला केवळ बडीशेपेचा (fennel seeds) वापर करावा लागेल. बडीशेप ही केवळ स्वयंपाक घरात वापरला जाणारा किंवा मुखवास म्हणून खाल्ला जाणारा पदार्थ नाही. बडीशेपेमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामध्ये ॲंटी-इन्फ्लामेटरी आणि ॲंटी- मायक्रोबियल गुण असतात. तसेच अनेक ॲंटी-ऑक्सीडेंट्स आणि पोषक तत्वही यामध्ये असतात. ज्यामुळे वेळेपूर्वी केस गळण्यापासून बचाव होतो. त्याशिवाय बडीशेप ही मुरुमे आणि सुजलेले डोळे (puffy eyes) हेही बरे करते.
आजच्या तरुण पिढीला केस गळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सहन करावी लागत आहे. बडीशेपमध्ये असलेले ॲंटी-ऑक्सीडेंट्स हे केसांची मुळं घट्ट करतात आणि फॉलिकल्सना पोषण देतात, ज्यामुळे केस मजबूत होतात. केस मजबूत बनवायचे असेल तर बडीशेप पाण्यात उकळावी आणि ते पाणी थंड होऊ द्यावे. त्यानंतर त्या पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून 2 वेळा असे केल्यास फरक जाणवू लागेल.
बडीशेप ही ॲंटीसेप्टिक असते. त्यामध्ये असलेले ॲंटी-बॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे ॲक्ने किंवा मुरुमांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. हे चेहऱ्यावर लावण्यासाठी बडीशेपेच्या बियांची पावडर मधात अथवा ताकात मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी व 10-15 मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.
बडीशेप ही नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे. त्याच्या बियांमध्ये डाययूरेटिक गुण असतात, जे शरीरातील अतिरिक्त चरबी काढण्यास मदत करतात. बडीशेप पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करावी व जेथे अतिरिक्त चरबी आहे, तेथे लावावी. नियमितपणे हा उपाय केल्यास फरक दिसू लागेल.
बडीशेप ही उत्तम स्क्रब म्हणून कार्य करते. त्यामुळे चेहऱ्यावर चमक येते. ओटमील आणि बडीशेप पाण्यात घालून ते गरम करावे आणि त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून 10-15 मिनिटे ठेवावे आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. आठवड्यातून 2 वेळा ही क्रिया करावी. चेहऱ्यावर चमक येऊ लागेल.