अहमदाबाद : एम.एस.युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या एका 18 वर्षाच्या मुलाचा कार्डिअक अरेस्टने मृत्यू झाल्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली. दीप श्यामजी चौधरी असं मृत मुलाच नाव आहे. दीप आपल्या मित्रांना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली. दीप चौधरी पाटन जिल्ह्याचा निवासी आहे. तो सायन्स शाखेत BSC च्या दुसऱ्यावर्षाला होता. तो शहरात पीजीमध्ये राहत होता. बुधवारी रात्री जेवणानंतर दीप त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी म्हणून वसतिगृहाच्या के.एम.मुन्शी हॉलमध्ये गेला.
“तो त्याच्या मित्रांबरोबर बोलत होता, हसण-खेळणं सुरु होतं. इतक्यात तो खाली कोसळला. मी त्यावेळी हॉस्टेलमध्ये होतो. दीपसोबत असलेल्या मुलांनी मला फोन करुन घडलेल्या प्रकाराबद्दल कळवलं” असं तेजस सोलंकीने सांगितलं. तो विद्यार्थी नेता आहे.
पोस्टमार्टम रिपोर्टवर लक्ष
दीप चौधरीला SSG रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केला. कार्डिअक अरेस्टमुळे दीपचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे, असं सायन्स फॅकल्टीचे डीन हरी कटारिया यांनी सांगितलं. “मृतदेहाच शवविच्छेदन करण्यात आलं असून रिपोर्ट आल्यावर समजेल” असं त्यांनी सांगितलं. दीप चौधरीचे वडिल सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत. दीप चौधरी अभ्यासात हुशार होता. त्याला वन्यजीव फोटोग्राफीची आवड होती.