नवी दिल्ली – भारतात पौगंडावस्थेतील प्रत्येकी चार मुलींपैकी तीन मुली सॅनिटरी पॅडचा (sanitary pads) वापर करतात. मासिक पाळीच्या काळात जननेंद्रियासंदर्भातील अनेक गंभीर आजार होऊ नयेत म्हणून सॅनिटरी पॅडचा वापर केला जातो. मात्र याच सॅनिटरी पॅडसंदर्भात करण्यात आलेल्या एका नव्या अभ्यासातून (study) धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या नव्या अभ्यासानुसार नॅपकिन्सच्या वापरामुळे कॅन्सरचा (cancer) धोका वाढू शकतो. तसेच वंध्यत्वाची (infertility) समस्याही उद्भवू शकते.
हे खरोखर चकित करणारे आहे, अशी प्रतिक्रिया टॉक्सिक लिंक या एनजीओचे प्रोग्राम कॉर्डिनेटर आणि या अभ्यासात सहभागी झालेले डॉ. अमित यांनी नोंदवली. सगळीकडे सहजपणे उपलब्ध असलेल्या सॅनिटरी नॅपकिनमध्ये काही अशी अनेक केमिकल्स आढळून आली आहेत, जी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत, असेही त्यांनी सांगितलं. या सॅनिटरी नॅपकिन्समध्ये कार्सिनोजेन, रिप्रॉडक्टिव्ह टॉक्सिन्स, एंडोक्राइन डिसरप्टर्स आणि अॅलर्जेन्स अशी अनेक गंभीर रसायने आढळून आल्याचे डॉ. अमित यांनी नमूद केले.
टॉक्सिक लिंक या एनजीओद्वारे करण्यात आलेला हा अभ्यास इंटरनॅशनल पोल्यूटेंट एलिमिनेशन नेटवर्कच्या एका चाचणीचा भाग असून त्यामध्ये भारतात सॅनिटरी नॅपकिन्स विकणाऱ्या 10 ब्रँड्सच्या उत्पादनांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासादरम्यान, संशोधकांना सर्व सँपल्समध्ये थॅलेट्स (phthalates) आणि व्होलाटाइल ऑर्गॅनिक कंपाउंड्स (VOCs) चे काही घटक आढळले. चिंतेची बाब म्हणजे, हे दोन्ही दूषित पदार्थ कॅन्सरच्या पेशी तयार करण्यास सक्षम आहेत.
या कारणामुळे वाढतो धोका
या एनजीओच्या आणखी एक प्रोग्राम कॉर्डिनेटर आणि या अभ्यासात सहभागी झालेल्या सदस्य आकांक्षा मेहरोत्रा यांनीही हा (खुलासा) याबाबत मत व्यक्त केले. सॅनिटरी पॅडच्या वापरामुळे रोग अथवा आजार वाढण्याचा धोका अधिक आहे, ही चिंतेची बाब आहे, असे आकांक्षाने सांगितले.
तर टॉक्सिक लिंकची चीफ प्रोग्राम कॉर्डिनेटर असलेल्या प्रीती यांनी सांगितले की युरोपियन देशांमध्ये या सर्वांसाठी काही नियम आहेत, पण भारतात असे कोणतेही विशिष्ट नियम नाहीत ज्याद्वारे लक्ष ठेवले जाते. विशेषत: रसायनांबद्दल कोणताही नियम नाही, असेही त्यांनी नमूद केले.
64% मुली करतात सॅनिटरी नॅपकिनचा वापर
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेतील (राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण) ताज्या आकडेवारीनुसार, 15 ते 24 या वयोगटातील सुमारे 64 टक्के भारतीय मुली या सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात. अलीकडच्या काळात याबबात जनजागृती वाढल्याने त्याच्या वापरातही वाढ झाली आहे. शहरी भागातील 77.5 टक्के तर ग्रामीण भागातील 58.9 टक्के महिला हे सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात.
IMARC ग्रुपच्या मते, सॅनिटरी उत्पादनांसाठी भारत एक प्रमुख बाजारपेठ आहे. 2021 साली सॅनिटरी नॅपिकनचा व्यवसाय 618 मिलियन डॉलर्स इतका झाला होता. तर 2027 पर्यंत ही बाजारपेठ 1.2 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.