नवी दिल्ली: सणा-सुदीचे दिवस आहेत, दिवाळी आता काही दिवसांवरच आली आहे. सणांचे दिवस उत्साहाने साजरे करण्यासाठी छान तयार होणे, नवे कपडे घालणे हे कॉमन आहे. चांगलं दिसण्यासाठी आपण चेहऱ्यापासून पायापर्यंत नीट लक्ष देऊन तयारी करतो. त्यामध्ये केसांना स्टायलिश (hair style) लूक देण्यासाठी हेअर स्ट्रेटनर (hair straightener) किंवा हीटिंग टूल्सचाही (heating tools) समावेश होतो. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालातून अशी माहिती समोर आली आहे की, हेअर स्ट्रेटनरचा वापर केल्यामुळे शरीरात कॅन्सरचा धोका वाढतो.
या लेखात आपण या संशोधनाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तसेच, हेअर स्ट्रेटनरमुळे आपले कसे नुकसान होते, हेही जाणून घेऊया.
अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की ज्या महिला हेअर स्ट्रेटनरचा जास्त वापर करतात त्यांना गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका वाढतो. या अहवालात असे म्हटले आहे की या प्रकारच्या स्ट्रेटनरमध्ये केमिकल्स असतात, जे त्वचा आणि केसांद्वारे शरीरात पोहोचतात. मात्र त्याचा परिणाम उशिरा दिसून येतो, पण कॅन्सरचा धोका कायम असतो.
हेअर स्ट्रेटनर किंवा इतर हिटिंग टूल्सचा वापर केल्याने आपले केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात. जेव्हाही केसांसाठी हेअर स्ट्रेटनरचा वापर केला जातो, त्यानंतर केसांमध्ये थोडासा चिकटपणा आढळून येतो. हे एक प्रकारचे केमिकलच असते.
आधी महिला केस सरळ करण्यासाठी इस्त्री गरम करून त्याचा वापर करायच्या आणि ही पद्धत सुरक्षितही मानली जाते. ज्या महिलांनी केसांचे रिबॉन्डिग केले आहे, त्यांचे केस काही काळानंतर खूप कोरडे दिसू लागल्याचेही आढळून आले आहे.
हेअर स्ट्रेटनरमध्ये असलेली केमिकल्स केसांसाठीच नव्हे तर त्वचेसाठीही अतिशय हानिकारक ठरू शकतात. तज्ज्ञांच्या मते, अशा स्थितीत एखाद्या व्यक्तीला त्वचेवर जळजळ जाणवू शकते. संशोधनानुसार, त्वचेत जळजळ हे सुरूवातीचे लक्षण असू शकते.
या संशोधनानुसार, हेअर स्ट्रेटनर मुळे केसांना व आरोग्याला धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र हेअर ब्लीच, हायलाइट्स या सर्वांचा गर्भाशयाच्या कॅन्सरशी काही संबंध असल्याचे आढळून आलेले नाही.