सध्याच्या काळात प्रत्येक जण स्वत:ला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. वजन वाढणार नाही याची काळजी घेत असतो. योगा, डाएट करत असतात आणि जीमलाही जात असतात. अनेकजण तर मेडिटेशनही करत असतात. वजन वाढू नये, कुठलाही आजार होऊ नये आणि आपण फिट राहावं हा त्यामागचा हेतू असतो. मात्र, हे फक्त स्वत:पुरतंच मर्यादित असतं. पण वजन वाढलं आणि योगा सुरू केला. त्यानंतर योगा ट्रेनरच बनल्याचा अपवादच वेगळा. हिना शाह या त्यापैकीच एक. वजन वाढलं म्हणून हिना शाह यांनी योगा सुरू केला. योगामुळे वजन कमी झालं. पण फिटनेसचा प्रवास त्यांनी इथपर्यंतच थांबवला नाही, तर त्यांनी थेट योगा ट्रेनर बनून इतरांची ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली. खासकरून रुग्णांना योगा शिकवण्यास त्यांनी सुरुवात केली.
हिना विपुल शाह या आरोग्यम योग केंद्र चालवतात. गेल्या आठवर्षापासून त्या योगा शिकवत आहेत. प्रेग्नंसीत त्यांचं वजन वाढलं. 80 किलो वजन झालं. बाथरूमला जातानाही त्यांना धाप लागायची. एके दिवशी तर श्वासच कोंडला. रात्री अडिच वाजता त्यांनी नवऱ्याला सांगितलं आणि रुग्णालयात ॲडमिट झाल्या. पण नीट उपचार झाले नाही. म्हणून त्या चेस्ट फिजिशियनक प्रभूदेसाईंकडे ट्रीटमेंट सुरू केली. प्रभूदेसाईंकडे उपचार सुरू असताना त्यांच्या दवाखान्यात एक योगाबाबतचं मॅगेझिन दिसलं. ते चाळत असताना अचानक काही तरी गवसल्याचा भास झाला. योगा हेच लाइफ आहे असं वाटलं अन् योगाच्या दिशेने प्रवास सुरू झाला, असं हिना शाह सांगतात.
आधी योगाचं प्रॉपर ट्रेनिंग घेतलं. स्वत:चं वजन कमी केलं. योगाने स्वत:च्या आयुष्यात प्रचंड बदल झाला. त्यामुळे मी मग इतरांना योगा शिकवण्यास सुरुवात केली. कोरोना काळात ऑनलाइन सेशन्स घेतले. कोरोना संपताच प्रत्यक्षात इमारतीच्या टेरेसवर लोकांना योगा शिकवण्यास सुरुवात केली. सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे योगा शिकवला जातो. सकाळी प्रौढांसाठीचे क्लास असतात तर संध्याकाळी लहान मुलांना योगा शिकवला जातो. लहान मुलांना खेळता खेळता योगा शिकवला जातो, असं हिना यांनी सांगितलं.
हिना शाह या रुग्णांना योगा शिकवतात. त्यांच्यातील निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम करतात. मी औषधं थांबवत नाही. कारण ते माझं काम नाही. रुग्णांना औषधे घेण्याचा आणि डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. मी योगाच्या माध्यमातून त्यांच्या फिटनेस आणि पॉझिटिव्हिटिवर भर देत असते, असंही त्यांनी स्पष्ट केलं. जॉबमध्ये असताना येणारे ताणतणाव, अॅसिडिटी, महिलांचे आजार, मायग्रेन अशा विविध आजाराने किंवा समस्यांनी ग्रस्त लोक माझ्याकडे येतात, असंही त्या म्हणाल्या.
माझ्याकडे एक 26 नर्षाची महिला आली होती. तिला मायग्रेनचा त्रास होता. दर 72 तासाने तिला मायग्रेनचा अटॅक यायचा. अटॅक आल्यावर ती प्रचंड त्रस्त व्हायची. भिंतीवर डोकं आपटावं असं तिला वाटायचं. मी तिची औषध सुरू ठेवली. डॉक्टरांकडे नियमित जायला सांगितलं. पण त्याचबरोबर तिला योगा शिकवला. विविध प्रकारचे तिला योगा शिकवले. मोबाईलसारख्या गोष्टींपासून दूर राहायला सांगितलं. आज त्या महिलेला 75 टक्क्यांपेक्षा अधिक फायदा झाल्याचं हिना सांगतात. प्रत्येकाने वेळात वेळ काढून किमान 15 मिनिटं योगा करावा, असा सल्ला त्या देतात.