कोलेस्ट्रॉल ही एक अशी समस्या आहे, जी वाढल्यास मधुमेह आणि हृदय विकाराचा त्रास उद्बवू शकतो. वयानुसार कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढतं कारण वय वाढतं तसं त्या व्यक्तीची ॲक्टिव्हिटी म्हणजेच शारीरिक हालचाल आणि रोगप्रतिकारक शक्ती (immunity) हे कमी होत जाते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करायचे असेल तर आहार आणि व्यायाम (exercise), हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. विशेषत: लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या लोकांनी रोजच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश केला पाहिजे. कोलेस्टेरॉलची पातळी जास्त असलेल्या लोकांनी हलक्या व्यायामाऐवजी उच्च तीव्रतेचा व्यायाम केला पाहिजे.
उच्च तीव्रतेचा व्यायाम केल्यास अधिक प्रमाणात फॅट व कॅलरी बर्न होऊ शकतात. हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते व्यायाम केले पाहिजेत, त्याबद्दल जाणून घ्या.
जॉगिंग आणि रनिंग –
धावणे आणि जॉगिंग करणे हा एक उत्तम व्यायाम आहे, ज्यामुळे कमी वेळात जास्त कॅलरी बर्न होऊ शकते. एव्हरीडे हेल्थ नुसार, ज्या लोकांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी जॉगिंग आणि धावणे यासारखे व्यायाम निवडले पाहिजेत. या व्यायामामध्ये रक्ताभिसरणाबरोबरच हृदयाचे ठोकेही वाढतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. ३० मिनिटांच्या सेशनमध्ये 250 ते 300 कॅलरीज बर्न करता येतात.
ॲरोबिक नृत्य –
ज्या लोकांना नृत्याची आवड आहे ते ॲरोबिक नृत्याचा व्यायाम निवडू शकतात. या व्यायामामध्ये उच्च तीव्रतेच्या हालचाली असतात, ज्या एकसलग म्हणजेच न थांबता केल्या जातात. ॲरोबिक डान्सचा हा व्यायाम संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉलसह लठ्ठपणा देखील कमी होऊ शकतो. हा व्यायाम 30 ते 45 मिनिटे करता येऊ शकतो.
दोरीवरच्या उड्या मारणे –
लहानपणी आपण सर्वांनीच दोरीवरच्या उड्या मारल्या असतील. हा एक उच्च तीव्रतेचा व्यायाम आहे जो शरीराला मजबूत करण्यास तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतो. वय आणि क्षमतेनुसार त्याचा सेट निवडता येतो. दोरीवरच्या उड्या मारल्याने पायांचे स्नायू बळकट होतात तसेच हृदयाचे ठोकेही वाढतात, जे फॅट बर्न करण्याचे काम करतात.
सायकलिंग –
सायकल चालवणे हे अनेक लोकांच्या नियमित दिनचर्येचा भाग बनला आहे. विशेषत: शहरात राहणारे लोक हे फिटनेससाठी सायकल चालवतात. सायकलिंग हाही एक उच्च तीव्रतेचा व्यायाम असून त्यामुळ कोलेस्ट्रॉल, मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयरोग नियंत्रित करण्यास मदत करू शकतो. उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुमारे 30 मिनिटे सायकलिंग केले जाऊ शकते.