धोक्याची घंटा… चीनचा व्हायरस कर्नाटकापाठोपाठ गुजरातमध्ये, तीन रुग्णांना लागण

| Updated on: Jan 06, 2025 | 2:48 PM

चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या एचएमपीव्ही व्हायरसचे तीन रुग्ण आता भारतात आढळले आहेत. कर्नाटक आणि गुजरातमध्ये बाळांना या व्हायरसची लागण झाली आहे. सर्दी, खोकला, आणि ताप ही याची प्रमुख लक्षणे आहेत. आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर असून, व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

धोक्याची घंटा... चीनचा व्हायरस कर्नाटकापाठोपाठ गुजरातमध्ये, तीन रुग्णांना लागण
HMPV virus
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसने आता भारतातही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात एचएमपीव्ही व्हायरसचे तीन रुग्ण आढळले आहेत. दोन रुग्ण कर्नाटकात सापडले तर आता एक रुग्ण गुजरातमध्येही आढळला आहे. गुजरातच्या अहमदाबादमद्ये एकाला लागण झाली आहे. कर्नाटकात एका आठ महिन्याच्या मुलाला आणि तीन महिन्याच्या मुलीला व्हायरसची लागण झाली आहे. तर अहमदाबादमध्ये दोन महिन्याच्या मुलाला लागण झाली आहे. त्यामुळे भारतातही आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे.

या व्हायरसची पहिली केस कर्नाटक आणि गुजरातच्या अहमदाबादमध्ये सापडली आहे. अहमदाबादमध्ये दोन महिन्याच्या मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत देशात एकूण तीन केसेस समोर आल्या आहेत. गुजरात सरकारनेही एचएमपीव्ही व्हायरसबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून संपूर्ण देशात खबरदारी घेतली जात आहे.

ट्रॅव्हल हिस्ट्री नाही

या नव्या व्हायरसची लागण झालेलं मूल हे मोडासा येथील आहे. त्याला अहमदाबादच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याची रक्त चाचणी केल्यानंतर हा आजार झाल्याचं आढळून आलं आहे. सध्या मुलाची तब्येत चांगली आहे. सर्दी, तापाची लक्षणे दिसल्यावर त्याला अहमदाबादला आणण्यात आलं होतं.

या मुलाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. त्यामुळे त्याच्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता फार कमी आहे. या मुलाला सर्दी आणि ताप आल्याने रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्या टेस्ट करण्यात आला. त्यावेळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

काय आहे व्हायरस?

एचएमपीव्ही व्हायरस हा अत्यंत घातक व्हायरस आहे. हा संसर्गजन्य रोग आहे. श्वसननलिकेतून प्रवेश करून फुफ्फुसापर्यंत हा आजार फैलावतो. कोव्हिड सुद्धा इतका घातक आजार नव्हता. पण दोन्ही व्हायरसची लक्षणे एकसमानच आहेत. हा व्हायरस मुख्यत्वे लहान मुलं आणि नवजात बालकांना होतोय. खोकला येणं, बलगम होणं, ताप येणं आणि घसा खवखवणं ही या व्हायरसची लक्षणे आहेत. या व्हायरसच्या संक्रमणानंतरची काही गंभीर लक्षणे समोर आली आहेत. अनेकांना श्वसनाचा त्रास होत असल्याचं आणि छातीत दुखू लागल्याचंही आढळून आलं आहे.