मधुमेह (diabetes) हा एक असा आजार आहे , ज्यामुळे अनेक समस्यांचा जन्म होतो. दिसण्याची समस्या, वजन कमी होणे, फुप्फुसांची समस्या, खराब केस याव्यतिरिक्त त्वचेच्या समस्येसाठी (skin problem) मधुमेह जबाबदार ठरू शकतो. मधुमेहाच्या रुग्णांना त्वचेशी संबंधित समस्या असणे सामान्य आहे. मधुमेहाच्या सुमारे ३० टक्के रुग्णांमध्ये (patients) त्वचेची समस्या आढळून येते. मधुमेहामध्ये शरीराची उपचार शक्ती कमी होते, ज्यामुळे कोणत्याही प्रकारची झालेली इजा, खोकला किंवा त्वचेशी संबंधित समस्या बरी होण्यास वेळ लागतो.
त्वचेच्या समस्येची लक्षणे मधुमेहाच्या सुरुवातीलाच दिसू लागतात. त्वचेची समस्या असल्यास पिवळे, लाल किंवा तपकिरी रंगाचे डाग पडणे, जड व कडक त्वचा, जंतुसंसर्ग होणे, फोड येणे आणि खाज सुटणे अशी लक्षणे शरीराच्या कोणत्याही भागात दिसू शकतात. मधुमेह असताना गरम पाण्याने आंघोळ किंवा स्नान केल्यास देखील त्वचेच्या समस्या वाढू शकतात. त्वचेच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी त्वचेची योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, त्वचेला संसर्गापासून वाचवण्यासाठी आपण खबरदारी घेऊ शकते.
स्वच्छतेकडे द्यावे लक्ष –
त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी स्वच्छता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ओन्ली माय हेल्थच्या मते, त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवल्यास त्वचेचे नुकसान होण्यापासून रोखता येते. विशेषत: अंडरआर्म्स, स्तनाच्या खाली, पायांच्या बोटांची मधली भागा आणि मांडीच्या भागाच्या दरम्यानची जागा अधिक स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्वचेवर साबण आणि शॉवर जेलचा जास्त वापर करू नका, अन्यथा त्वचा कोरडी होऊ शकते.
गरम पाण्याने स्नान करणे टाळावे –
गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेवर जळजळ होणे किंवा लाल रंगाचे रॅशेस येऊ शकतात. गरम पाण्याचा वापर केल्यामुळे त्वचेत असलेले नैसर्गिक तेल आणि प्रोटीन्स नष्ट होतात, ज्यामुळे त्वचा आणखीनच कोरडी होते व खाज सुटू लागते. अनेक वेळेस गरम पाण्यामुळे त्वचा सोलवटली देखील जाऊ शकते. दमट हवामानात दोनदा आंघोळ करावी जेणेकरून त्वचेला संसर्गापासून संरक्षण मिळू शकेल. मधुमेह असेल तर शक्यतो गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे.
त्वचा मॉयश्चराइज ठेवा –
त्वचा मॉयश्चराइज्ड ठेवल्याने अनेक समस्या कमी होऊ शकतात. दररोज त्वचेला मॉयश्चरायझिंग केल्याने त्वचेला कोरडेपणापासून संरक्षण मिळू शकते. त्वचेतील पेशींचे नूतनीकरण करण्यासाठी, चांगल्या प्रतीचे मॉयश्चरायझर वापरणे आवश्यक आहे. अधिक कोरडी त्वचा असल्याने त्वचेच्या ॲलर्जीचा धोकाही वाढतो.
जखमेवर लगेच उपचार करा –
मधुमेह झाल्यास आपली त्वचा अतिशय संवेदनशील बनते ज्यामुळे काही लागण्याचा किंवा जखम होण्याचा धोका खूप वाढतो. मधुमेह झालेला असताना एखादी जखम भरण्यास किंवा बरी होण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळे वेळेवरच त्याच्यावर उपचार करणे अतिशय आवश्यक असते. जखम बरी करण्यासाठी अँटी-बायोटिक्सचा वापर केला जाऊ शकतो.