नवी दिल्ली – वाढती थंडी, आणि दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण (pollution) यामुळे लहान मुले न्युमोनियाला (pneumonia) बळी पडत आहेत. ज्या मुलांना लस देण्यात आलेली नाही, त्यांना या आजारापासून अधिक धोका असतो. फेलिक्स हॉस्पिटलचे चेअरमन आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. डीके गुप्ता यांच्या सांगण्यानुसार, ओपीडीमध्ये लहान मुलांना न्यूमोनियाचा त्रास होत असल्याचे आढळून आले आहे. मुलांच्या मृत्यूचे मुख्य कारण न्युमोनिया हे आहे . या आजाराची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपचार सुरू केल्यास मुलांचे संरक्षण करता येते. थंडीच्या या ऋतूमध्ये (should take care of children in winter) मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मुलांना न्युमोनियाचा धोका जास्त असतो.
अशा वेळी मुलांना संपूर्ण अंग झाकलं जाईल असे कपडे घालावेत. त्याचे कान झाकून ठेवावे व थंडीपासून त्यांचा बचाव करा. मुलं वेगाने श्वास घेत असतील, त्यांच्या छातीतून घरघर आवाज येत असेल तर हीदेखील न्युमोनियाची लक्षणे असू शकतात. पाच वर्षाखालील बहुतेक लहान मुलांना न्युमोनिया झाल्यास, त्यांना श्वास घेण्यास आणि दूध पिण्यास त्रास होतो. तर गोवर हा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. ताप आणि पुरळ येणे याशिवाय कानात इन्फेक्शन, संक्रमण, अतिसार, न्युमोनिया असे विविध आजार होण्याची शक्यता असते. गोवर रोखण्यासाठी लस घेणे हे अत्यंत प्रभावी आहे.
कोरोना काळात मुलांच्या नियमित लसीकरणावर परिणाम झाला. त्यामुळे अनेक मुलांना लसीचा कोर्स पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे वेळच्या वेळी लहान मुलांची लसीकरण होणे, गरजेचे आहे. न्युमोनिया लसीकरणाचा पहिला डोस हा जन्मानंतर सहा आठवड्यांनी, तर दुसरा 10 आठवडे, तिसरा 14 आठवडे आणि 18 महिन्यांनंतर बूस्टर डोस दिला जातो.
असा करा न्युमोनियापासून बचाव
लसीकरण हा न्यूमोनिया टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. न्यूमोकॉकल लस, पीसीव्ही 13, हिमोफिलस इन्फ्लूएन्झा टाइप बी, ही लस मुलांना बॅक्टेरियाच्या न्युमोनियापासून वाचवू शकते. त्यासोबतच हँडवॉशने नियमितपणे हात स्वच्छ धुतले पाहिजेत. खोकताना आणि शिंकताना नाक व तोंड झाकून ठेवावे. अशा पद्धतींचा अवलंब केल्यास तुम्ही संसर्ग होण्यापासून रोखू शकता.
न्युमोनियाची लक्षणे :
– श्वास घेताना किंवा खोकताना छातीत वेदना होणे
– कफयुक्त खोकला, क्वचित हिरव्या अथवा रक्ताच्या रंगाचा कफ पडणे
– खूप थकल्यासारखे वाटणे
– भूक कमी लागणे
– ताप येणे
– घाम येणे व थंडी वाजणे
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)