मुंबई: कोलेस्ट्रॉल ही एक गंभीर समस्या आहे. कोलेस्ट्रॉलची समस्या खूप लोकांना आहे. वयाच्या चाळिशीनंतर कोलेस्ट्रॉलमुळे होणारे आजार जीवावर बेतणारे असतात. कोलेस्ट्रॉल हा एक प्रकारचा चिकट पदार्थ असतो जो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो. जर याची लेव्हल वाढली तर नसांमध्ये ब्लॉकेज होऊन रक्त प्रवाह थांबू शकतो. रक्त प्रवाह थांबल्यावर अर्थातच पुढे हार्टचे आजार, हार्ट स्ट्रोक, हार्ट अटॅक यासारख्या गोष्टी होऊ शकतात ज्या जीवावर बेतणाऱ्या आहेत.
वजन वाढणे, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल या आजारांचा धोका वयाच्या चाळिशीनंतर वाढत जातो. मधुमेह, सांधेदुखी हृदयरोग या सगळ्या आजारांसोबतच कोलेस्ट्रॉल हा आजार देखील या वयात होऊ शकतो. हा आजार होण्यामागे अनुवांशिक, आहार चांगला नसणे, खराब जीवनशैली अशी अनेक कारणे असू शकतात.
ज्या खाण्यात सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट कमी असेल अशा गोष्टी खाणे टाळा. प्रक्रिया केलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, रेड मीट, अधिक फॅट असणारे डेअरी प्रॉडक्ट अशा पदार्थांचं सेवन बंद करा कारण याने कोलेस्ट्रॉल वाढतं. मेडीलाइन प्लसच्या रिपोर्टनुसार फळे, भाज्या, अंडे, चिकन, धान्य, शेंगदाणे, ऑलिव्ह ऑइल, एवोकॅडो या पदार्थांचं सेवन आवर्जून करा.
भरपूर व्यायाम करा. पळणे, चालणे, सायकलिंग करणे, पोहणे किंवा कार्डिओ, योगा, एरोबिक व्यायाम अशा पद्धतीचे व्यायाम करा. आठवड्यात कमीत कमी 150 मिनिटांचा तरी व्यायाम करावा.
वजन जर जास्त असेल तर कोलेस्ट्रॉलची समस्या होण्याचा धोका आणखी असतो. त्यामुळे वजन कमी करावं, विशेषतः पोटाची चरबी कमी करावी. पोटाची चरबी जर कमी करता आली तर यामुळे तुमची कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होऊ शकते.
कोलेस्ट्रॉल दोन पद्धतीचे असतात. एक चांगला आणि एक वाईट. सिगारेट ओढायची सवय असेल तर त्याने रक्त वाहिन्यांना नुकसान पोहचतं याने अर्थातच चांगला कोलेस्ट्रॉल कमी होतो. त्यामुळे स्मोकिंग आणि ड्रिंकिंग या सवयी बंद करणं आरोग्यासाठी उत्तम!
खूप काळासाठी तुम्ही जर ताणतणावत असाल तर त्याचा परिणाम कोलेस्ट्रॉल लेव्हलवर होतो. तणावमुक्त होण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधा जसं की व्यायाम, योगा, प्राणायाम , ध्यान लावून बसणे वगैरे वगैरे…याशिवाय तुम्ही तुम्हाला आवडेल ते काम करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोलेस्ट्रॉल वेळोवेळी चेक करत राहा म्हणजे तशी काळजी घेता येईल.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)