आई होणे ही प्रत्येक स्त्री साठी एक आनंदाची भावना असते. मात्र पहिल्यांदाच आई बनण्याचा आनंद घेणाऱ्या महिलांना गर्भधारणेचे (Pregnancy) अनुभव नवीन असतात. या काळात शरीरात (changes in body) खूप बदल होत असतात. त्यामुळे बऱ्याचदा महिलांना भीती वाटू शकते. त्यांच्या मनात अनेक शंका असतात. मातृत्वामुळे होणाऱ्या बदलांबद्दल त्यांना उत्सुकता तर असतेच पण सर्व काही नीट होईल ना, याची भीतीही वाटत असते. पहिलाच अनुभव असल्याने बऱ्याच गोष्टींची माहिती नसते. अशावेळेस पॅनिक होण्यापेक्षा, चिंता करत बसण्यापेक्षा (do not panic) शांतपणे परिस्थिती हाताळावी, गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गर्भधारणेदरम्यान दिसणारी काही लक्षणे सामान्य असतात. योग्य काळजी घेतल्यास हा काळ आनंदाने व्यतीत करता येतो. पहिल्यांदाच प्रेग्नन्ट असाल तर या गोष्टींबद्दल जरुर जाणून घ्या.
तुमचे पीरियड्स (मासिक पाळी ) चुकले असतील, गर्भधारणा झाली असेल तर तुम्हाला पाठदुखी, उलटीची भावना, मूड स्विंग्स, स्तनाला हात लागताच हुळहुळणे अथवा दुखणे अशी लक्षणे दिसू लागतात. तसेच काहीतरी वेगळे, चटपटीत खावे अशी इच्छाही होते. मात्र या लक्षणांमुळे बऱ्याच महिला संभ्रमित होतात, गोंधळतात. प्रेग्नन्सीची काही लक्षणे अतिशय स्पष्ट असतात. अशी कोणतीही लक्षणे जाणवल्यास घरी प्रेग्नन्सी टेस्ट करून पहावी.
गर्भधारणेत कोणताही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी बरीच जोडपी प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापूर्वी गायनॅकॉलॉजिस्टचा सल्ला घेतात. प्रेग्नन्सी निश्चित झाल्यावरही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नियमितपणे सर्व चेकअप्स करावीत.
प्रेग्नन्सीदरम्यान अनेक लक्षणे दिसू शकतात. प्रेग्नन्सीच्या पहिल्या काही महिन्यात काही महिलांना थोडासा रक्तस्त्राव होतो. मात्र तो मासिक पाळीचा रक्तस्त्राव नसतो. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. हा रक्तस्त्राव थोडासा करडा किंवा गुलाबी असू शकतो. अशावेळी न घाबरता डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
गर्भवती महिलेने काय खावे, काय खाऊ नये याबद्दल आजूबाजूच्या अनुभवी महिला अनेक सल्ले देत असतात. त्यामुळे त्या महिलेचा गोंधळ उडू शकतो. मात्र अशा वेळी गोंधळून न जाता व्हिटॅमिन व हेल्थ सप्लीमेंट्ससह पौष्टिक व संतुलित आहार घ्यावा. डॉक्टरांशी सल्ला मसलत करून तुम्ही तुमचा डाएट चार्टही तयार करू शकता. योग्य आहार घेतल्यास बाळाचे वजन योग्य प्रमाणात वाढते. मात्र प्रेग्नन्सीदरम्यान मद्यपान, धूम्रपान आणि कॅफेनचे सेवन बिलकुल करू नये. ते तुमच्या व येणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यावर अनेक महिलांना करिअरची, कामाची चिंता वाटू लागते. मात्र त्यामुळे जास्त त्रास करून घेऊ नका. हे सर्व सांभाळूनही तुम्ही तुमचे काम करू शकता. तसेच डिलीव्हरीनंतर काही महिन्यांनी तुम्ही तुमचे काम पुन्हा सुरू करू शकता.
प्रेग्नन्सी पहिली असो वा दुसरी, प्रत्येक महिलेला लेबर पेनची भीती तर वाटतेच. मात्र त्यामुळे घाबरून न जाता लेबर पेनची प्रोसेस समजून घेऊन, त्याचा त्रास कमी करण्यासाठी काही खास व्यायाम प्रकार शिकून घ्या. त्यामुळे तुमची डिलीव्हरी सोपी होऊ शकेल.