मुंबई : जगातील अनेक विकसित आणि समृद्ध देशांमध्ये संसर्गजन्य रोगांचे (infectious diseases) प्रमाण नगण्य आहे, परंतु कॅलरीयुक्त खाद्य आणि आरामदायी जिवनशैली यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकारांचा जन्म झाला. परिणामी या विकसीत म्हणवणाऱया देशांमधील बालक-तरुणांना आता दृष्टी क्षीणतेची लागण झाली आहे. दृष्टी कमी होणे आणि अंधत्वाच्या समस्येला मायोपिया असे म्हणतात. मायोपिया या आजाराने (Myopia) ग्रासले की, दूरच्या गोष्टी पाहणे फार कठीण होते. एका संशोधनात असे निष्पन्न झाले आहे की, आशिया आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये जवळपास ८० टक्के शाळकरी मुलांची दृष्टी अधू (Children’s vision is impaired) झाली आहे. या संशोधक अहवालात म्हटले आहे की, 1960 च्या दशकात आर्थिक समृद्धी सुरू होण्यापूर्वी, मायोपिया पूर्व आशियामध्ये अस्तित्वात नव्हता, परंतु आता मात्र त्याने रौद्र रूप धारण केले आहे.
प्रकाश व्यवस्था कमी असलेल्या वर्गात मुले जास्त वेळ घालवत असल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे या प्रकरणाशी संबंधित तज्ज्ञांचे मत आहे. अहवालात नमुद केल्याप्रमाणे आशियाई देश दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये दर 10 पैकी 9 विद्यार्थी आणि तरुण या आजाराने ग्रस्त आहेत. शिवाय शेजारील चीनमध्येही हा आजार वेगाने पसरत आहे.
प्राप्त आकडेवारी दर्शवते की, ग्वांगझू प्रांत आणि आतील मंगोलियातील सुमारे 80 टक्के तरुण मायोपियाने ग्रस्त आहेत. युरोपमध्ये त्याचा दर आशियापेक्षा किंचित कमी आहे आणि हा आकडा 20 ते 40 टक्क्यांच्या आत-बाहेर आहे. अमेरिकेत 17 ते 19 वर्षे वयोगटातील 59 टक्के तरुण मायोपियाचे बळी आहेत. ऑल इंडिया ऑप्थॅल्मोलॉजी सोसायटीचे अध्यक्ष डॉ.ललित वर्मा यांनी या प्रकरणात महत्त्वाची माहिती देतांना सांगीतले की, मायोपिया हा सर्वात व्यापक आणि अतिशय सामान्य डोळ्यांचा विकार आहे.
डॉ.वर्मा म्हणतात की जगातील 20 टक्के लोकसंख्या या आजाराने ग्रस्त आहे, ज्यामध्ये 45 टक्के प्रौढ आणि 25 टक्के किशोरवयीन मुले आहेत. त्यांच्या मते या आजाराकडे लक्ष न देणे आणि उपचार न घेणे हे अंधत्वाचे मुख्य कारण बनते. त्यांनी सांगितले की, कोविड काळात आणि डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजेच स्मार्ट फोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर स्क्रीनवर अधिकाधीक वेळ घालवणे यामुळे लहान मुले आणि शाळकरी मुले विविध प्रकारच्या डोळ्यांच्या विकारांना बळी पडत आहेत.