संपूर्ण जगभरात उद्या म्हणजेच 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवसाला अत्यंत मोठे महत्व देखील आहे. मुळात म्हणजे योगा कोणत्याही एका दिवसासाठी नव्हे तर दररोज करणे महत्वाचे आहे. योगा केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यासही मदत होते. या दिवसाचा उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे आहे. 21 जून ही आंतरराष्ट्रीय योग दिवसाची तारीख नेमकी का निवडली गेलीये आणि या तारखेचे नेमके काय महत्व आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
27 सप्टेंबर 2014 रोजी पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. विशेष म्हणजे त्याचवर्षी 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने हा प्रस्ताव मंजूर केला. हेच नाही तर 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा देखील केली.
21 जून 2015 हा दिवस जगभरात सर्वात पहिल्यांदा योगा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या दिवशी जगभरातून लाखोंच्या घरात लोकांनी एकत्र येत योगाभ्यास केला. नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला त्यावेळी तब्बल 177 देशांचा पाठिंबा दिला होता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नेमका 21 जून हाच दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून का निवडण्यात आला?
21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्याचे कारणही अत्यंत मोठे आहे. 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे, ज्याला उन्हाळी संक्रांती म्हणतात. यामुळेच या दिवसाची निवड ही आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून करण्यात आली. आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत योगा करताना दिसतात.
दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिनाची खास थीम देखील ठेवली जाते. यंदा योगा दिनाची खास थीम ही महिलांवर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिन 2024 ची थीम ‘महिला सशक्तिकरणसाठी योग’ अशी आहे. दरवर्षी काहीतरी वेगळा संदेश देणारी थीम आंतरराष्ट्रीय योगा दिनाची असते. यावेळी महिलांना केंद्रित ठेवून ही थीम ठेवण्यात आलीये.