मुंबई : वाढलेले वजन कमी (Weight loss) करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. अनेकदा खराब जीवनशैली आणि अस्वस्थ आहारामुळे या समस्येचा सामना करावा लागतो. वाढलेल्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करणे आणि सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या सलादचाही आहारात समावेश करू शकता. यामुळे आपल्या शरीरातील कॅलरीज (Calories) नियंत्रणात राहतात आणि परिणामी वजन अजिबात वाढत नाही. मात्र, जर तुम्ही जास्त प्रमाणात कॅलरीज घेत असाल तर तुम्हाला ते बर्न करणे देखील आवश्यक आहे. फळे आणि भाज्या वापरून तुम्ही अनेक प्रकारचे सलाद बनवू शकता, ते स्वादिष्ट तसेच आरोग्यदायी देखील असते. विशेष म्हणजे सलादचा (Salad) आहारात समावेश केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
हंगाम कोणताही असो काकडीचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. काकडीमुळे वजन नियंत्रणात राहण्यास देखील मदत होते. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी देखील असते. यासाठी एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि काकडी मिक्स करून घ्या. त्यात मुळा आणि गाजरही टाका. त्यावर लिंबाचा रस, काळी मिरी, पुदिन्याची चटणी, जिरेपूड आणि खडे मीठ टाका. ते चांगले मिसळा. आता हे स्वादिष्ट सलाद म्हणून खा, ते खूप आरोग्यदायी आहे, त्याचबरोबर वजन झपाट्याने कमी होण्यासही मदत करते. तुम्ही हे सलाद कोणत्याही वेळात खाऊ शकता.
राजमा भातासोबत खायला जवळपास सर्वांनाच आवडतो. मात्र, राजमाचे सलाद आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी अर्धा कप राजमा घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोबी घाला. या सलादमध्ये तुम्ही अक्रोड आणि शेंगदाणे सारखे ड्राय फ्रूट्स देखील घालू शकता. चव वाढवण्यासाठी, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि बदाम देखील घाला. हे अत्यंत आरोग्यदायी सलाद आहे. याचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये नक्की समावेश करा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
जर तुम्हाला तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त अन्नाचा समावेश करायचा असेल तर तुम्ही आहारात चण्यापासून बनवलेल्या सलादचा समावेश करू शकता. व्यायाम करणाऱ्यांसाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे असतात. यामुळे आहारामध्ये जास्तीत-जास्त प्रथिन्यांचा समावेश करा. यासाठी एका भांड्यात बारीक चिरलेली गाजर, हिरवी शिमला मिरची, पनीर हे सर्व मिक्स करून घ्या. आता या भांड्यात उकडलेले चणे, मीठ, मिरपूड आणि तिखट घाला. त्यात थोडे ऑलिव्ह ऑईल टाकून चांगले मिक्स करून घ्या. त्यात थोडासा लिंबाचा रस घाला आणि सर्व्ह करून घ्या.