नवी दिल्ली: तोंडात आलेले फोड किंवा अल्सर (mouth ulcer) हे अतिशय वेदनादायक असतात आणि ते एका आठवड्यापर्यंत राहू शकतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या तोंडातील त्वचेचा थर लहान, उथळ आणि दाणेदार असतो तेव्हा असा त्रास होतो. या लहान फोडांमुळे होणारी वेदना (pain) आणि अस्वस्थता खूप तीव्र असते. या फोडांमुळे खाणे, पिणे आणि बोलणे यासारख्या दैनंदिन क्रियांमध्ये अडथळा (problems) येऊ शकतो.
तोंडामध्ये असे फोड येण्याची अनेक कारणे असतात. त्यापैकी सर्वात सामान्य कारण म्हणजे चुकून तोंडाचा आतील भाग चावला जाणे किंवा दात/टूथब्रश इत्यादींमुळे घर्षण होणे. तसेच दातांच्या ब्रेसेस, जीवनसत्त्वांची कमतरता असणे, नीट झोप न लागणे आणि पुरेसे पाणी न पिणे किंवा तणाव, ही त्यामागची कारणे असू शकतात.
अनेकदा लोक तोंडाच्या अल्सरपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय शोधतात, पण औषधांऐवजी तुम्ही काही घरगुती उपायांच्या मदतीने तोंडाचा अल्सर बरा करू शकता.
तोंडाच्या अल्सरसाठी काही घरगुती उपाय आहेत ज्याचा वापर करून तुम्ही वेदना कमी करू शकता आणि लवकर बरे होऊ शकता. ते उपाय कोणते हे जाणून घेऊया.
घरच्या घरी तोंडाच्या फोडांवर उपचार करायचा असेल तर कच्चा मध हा उत्तम पर्याय ठरतो. मधातील बॅक्टेरिआला विरोध करणारे गुणधर्म हे ओलावा प्रदान करतात तसेच ते कोरडे होण्यापासून रोखून प्रभावित क्षेत्रावर उपचारहीकरतात. कच्च्या मधात चिमूटभर हळद मिसळून ते लावल्यानेही तोंडातील अल्सर दूर होतात.
नारळाचे तेल अथवा खोबरेल तेल हा एक असा घरगुती उपाय आहे जो सगळ्या घरांत सहज उपलब्ध असतो. नारळाच्या तेलामध्ये अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म तसेच दाहक-विरोधी गुणधर्म असतात. नारळाचे तेल लावल्याने वेदनांपासून त्वरित आराम मिळतो.
त्याचा वापर केल्याने झटपट आराम मिळतो व दुखणे कमी होते. तोंडात फोड आल्यास तुम्ही दिवसभरात कितीही वेळा नारळाचे तेल लावू शकता. बाधित भागावर अर्धा चमचा नारळाचे तेल लावल्यास दुखण्यापासून त्वरित आराम मिळेल.
कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तर कोरफडीचा रस हा त्याच्या सुखदायक गुणधर्मांसाठी ओळखले जाते. कोरफडीचा रस नियमितपणे वापरल्यास तोंडात होणाऱ्या वेदना कमी होतात. कोरफडीच्या रसाचा वापर केल्यास ते उपचार प्रक्रियेस गती देते आणि वेदना नियंत्रित करते.
तोंडाच्या फोडांपासून आराम मिळण्यासाठी कोरफडीचा रस दिवसातून किमान दोन वेळा तोंडाला लावावा. जर तुमच्याकडे कोरफडीचा रस नसेल तर जिथे फोड आला आहे, त्या भागावर कोरफड जेल लावावे.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली तुळस ही तोंडात आलेले फोड कमी करण्यात प्रभावी ठरते. तुळशीमध्ये असलेले गुणधर्म हे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात व निर्जंतुकही करतात.
तोंडातील अल्सरच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुळशीची पाने चावावी आणि त्यावर कोमट पाणी पिऊन दिवसातून दोनदा गुळण्या कराव्यात. जर तुमच्याकडे तुळशीची पाने नसतील तर त्याऐवजी मेथीची पाने वापरू शकता.
ॲपल सायडर व्हिनेगर हा एक लोकप्रिय घटक आहे, जो अनेक आजारांवर उपाय म्हणून वापरला जातो. त्याची आम्लीय प्रकृती ही जखमांसाठी कारणीभूत असलेल्या जीवाणूंना मारण्याचे काम करते. तोंडात फोड आल्याने होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी ॲपल सायडर व्हिनेगरचे मिश्रण पाण्यात मिसळून त्याने आपले तोंड स्वच्छ धुवावे.
या मिश्रणाचा वापर केल्याने थोड्या वेदना होत असल्या तरी बरेच लोक तोंडात अल्सर आल्यास याचा उपयोग करतात. मीठ हा एक जुना घटक आहे ज्याचा उपयोग जखमा भरण्यासाठी आणि त्यामुळे होणारे बॅक्टेरिया कमी करण्यासाठी केला जातो. श्वासाची दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया कमी करण्यासाठीही मीठाच्या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो.