मुंबई: तुम्हाला अपचन किंवा छातीत जळजळ (Acidity) होत असेल तर सावध व्हा! ही पोटाच्या व जठराच्या कर्करोगाची (cancer) लक्षणे असू शकतात. लवकर निदान झाले तर हा कर्करोग बरा होऊ शकतो. पण बरेचदा लसिका ग्रंथी व शरीराच्या इतर भागात हा कर्करोग पसरेपर्यंत त्याचे निदान होत नाही. ही लक्षणे इतर आजारांचीही असतात. त्यामुळे शरीरातील ही लक्षणे दिसली तर ताबडतोब वैद्यकीय तज्ज्ञांची भेट घ्या. जठराच्या कर्करोगाला पोटाचा कर्करोग असेही म्हणतात. यात जठराच्या अस्तरावर सामान्य पेशींची जागा कर्करोगाच्या पेशी घेतात. हा कर्करोग वेगाने पसरतो. त्यामुळे परिणामकारक उपचारांसाठी वेळेवर निदान महत्त्वाचे असते, असं मुंबईतील एचसीजी कॅन्सर सेंटरमधील ज्येष्ठ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. निनाद काटदरे (Dr. Ninad Katdare) यांनी सांगितलं.
छातीत जळजळ होणे, अपचन, अन्न गिळणे कठीण जाणे, भुकेच्या तीव्रतेत बदल, मळमळ, जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटणे, उलटी येणे, उलटीतून रक्त पडणे, पोटाला सूज येणे, बेंबीच्या वरील भागात अस्वस्थ वाटणे, पोटदुखी, थोडेसे अन्न पोटात गेल्या गेल्या पोट भरल्यासारखे वाटणे, विनाकारण वजन घटणे, हिमोग्लोबिन कमी होणे ही पोटाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत, असं डॉ. निनाद काटदरे म्हणाले.
GERD, गॅस्ट्रायटिस किंवा पेप्टिक अल्सरसारख्या आजारांचीही लक्षणे साधारण अशीच असतात. त्यामुळे औषधे घेऊनही ही लक्षणे कायम राहिली तर त्यांची सखोल तपासणी करून पोटाच्या कर्करोगाची शक्यता फेटाळून लावणे हितावह असते. पोटाच्या कर्करोगाचे वेळीच निदान झाले नाही तर तो जीवावर बेतू शकतो. पोट व अन्ननलिकेशी संबंधित आजार, स्थूलपणा, गॅस्ट्रायटिस, पोटाच्या कर्करोगाची कौटुंबिक पार्श्वभूमी, हेलिकोबॅक्टर पायलोरीला झालेला संसर्ग, पोटाला असलेली दीर्घकालीन सूज, अति प्रमाणात मद्यपान, धुम्रपान, तंबाखूसेवन, मेद, मीठाचे प्रमाण अधिक असलेल्या, धूर दिलेल्या पदार्थांचे किंवा पिकल्ड पदार्थांचे अति प्रमाणात सेवन हे घटक पोटाच्या कर्करोगासाठी कारणीभूत असतात.”, असे ते म्हणाले.
भरपूर तंतुयुक्त पदार्थ, फळे, ताजी फळे व भाज्या खाणे, होल ग्रेन पदार्थ, मुबलक जीवनसत्वे असलेले पदार्थ खाल्ल्याने या आजाराची शक्यता कमी होते. या आजारावर रेडिएशन थेरपी, केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया या तीन पद्धतींनी उपचार करण्यात येतात, अशी पुष्टी डॉ. काटदरे यांनी केली.