वर्धा: जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आज रात्रीपासून जिल्ह्यात 36 तासांची कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच नंदूरबार, बीड आणि नाशिकच्या चांदवडमध्येही कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला असून या काळात दुकानांपासून ते रिक्षापर्यंत सर्व काही बंद राहणार आहेत. या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. (Lockdown, night curfew and more in Maharashtra’s some district)
वर्धा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करताना विकेंडला 36 तास संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. शनिवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे.मार्च महिन्याच्या प्रत्येक विकेंडला ही संचारबंदी होती. तर मागील विकेंडला धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर 36 तासांची संचारबंदी वाढवत 60 तासांची करण्यात आली होती. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या विकेंडला 36 तासांची संचारबंदी राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिली.
काय बंद राहणार?
संचारबंदीच्या कालावधीत वैद्यकीय सेवा वगळता दुकाने, मॉल्स, मार्केट बंद राहतील. या काळात हॉटेल्स, रेस्टॉरंट, ट्रॅव्हल्स, खासगी परिवहन सेवा, एसटी, ऑटोरिक्षा सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू राहील. दूध डेअरी पहाटे 6 ते सकाळी 10 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहील. एमआयडीसीतील आस्थापनाही सुरू ठेवण्यात येणार आहे. पेट्रोल पंपदेखील बंद राहणार आहेत, अशी माहिती देशभ्रतार यांनी दिली. तसेच कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी या संचारबंदीला सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
कशी असेल वर्ध्यातील संचारबंदी
आज रात्री 8 वाजल्यापासून 36 तासांसाठी संचारबंदी राहील
शनिवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 8 पर्यंत संचारबंदी राहील
धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मागील विकेंडला 60 तासांची संचारबंदी होती
वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार
पेट्रोल पंप देखील बंद राहणार
नंदुरबारमध्ये शनिवार-रविवारी लॉकडाऊन
नंदुरबार जिल्ह्यात 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊन करण्यात आला तरी जिल्ह्यात दररोज 800 रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात दर शनिवारी-रविवारी लॉकडाऊन करण्यात येत आहे. या दोन दिवसात जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. पोलीसही जिल्ह्यात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. विनाकारण मास्क लावून फिरणाऱ्यावर कारवाई केली जात आहे.
खंडेरायाचे मंदिर आजपासून 7 दिवसांसाठी बंद
उभ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी येथील खंडेरायाचे मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 3 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यंत खंडोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र या काळात खंडोबाची त्रिकाळ पूजा आणि इतर विधी मात्र सुरू राहणार आहे. कोरोना बांधितांची वाढती संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमरावतीत वेग मंदावला
फेब्रुवारी महिन्यात अमरावती जिल्हात कोरोना रुग्णसंख्या व मृत्यू संख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात 14 दिवस पुर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर देशात सर्वात आधी अमरावतीत लॉकडाऊन करण्यात आला होता. या लॉकडाऊनच्या काळात आरोग्य यंत्रणांनी केलेलं प्रभावी काम, कोरोना रुग्णांची ट्रेसिंग आणि नागरिकांनी दिलेलं सहकार्य आदीच्या बळावर अखेर अमरावतीतील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. जिल्ह्यात कोरोना वेग मंदावल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यातील जनतेचे आभार मानले आहेत. अमरावतीत कोरोना रुग्ण संख्येत घट होत असली तरी मृत्यू संख्या वाढत आहे. रुग्ण उशिरा हॉस्पिटलमध्ये येतात व जास्त वयाचे असतात. तोपर्यंत आजार बळावलेला असतो त्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. रुग्णालयात सर्व सोई सुविधा उपलब्ध असून मुलामुलींनी आपल्या आई वडिलांची काळजी घरीच घ्यावी. त्यांचे कोरोना लसीकरण करून घ्यावे, असं आवाहनही त्यांनी केलं.
भीमाशंकर मंदिर बंद
पुणे जिल्ह्यातील अंशतः लॉकडाऊनमध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर आणि आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी आजपासून बंद ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काल जिल्ह्यतील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
बीडमध्ये दहा दिवस लॉकडाऊन
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णाच्या वाढत्या आकडेवारीला आळा बसावा म्हणून जिल्हा प्रशासनाकडून दहा दिवसाचा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात एसटी सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र खासगी वाहन सुरू असल्याने एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. कोरोनाचे नियम पाळून एसटी सेवा सुरू राहिली पाहिजे. परंतु, लॉकडाऊन नको अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. यादरम्यान बीड डेपोला दिवसाकाठी 45 लाखांचा तोटा सहन करावा लागतोय. (Lockdown, night curfew and more in Maharashtra’s some district)
चांदवडमध्ये जनता कर्फ्यू
नाशिक शहरा पाठोपाठ जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही कोरोना चा उद्रेक वाढला असून त्यामुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा आणि कोरोनाची साखळी तुटावी म्हणून चांदवड नगर परिषद हद्दीत आजपासून 9 दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला असून आज पहिल्या दिवशी या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. (Lockdown, night curfew and more in Maharashtra’s some district)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 April 2021https://t.co/x62wzAztBy
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 3, 2021
संबंधित बातम्या:
30 एप्रिलपर्यंत कोरोनाची साखळी तोडणं शक्य; डॉ. अविनाश सुपेंनी सांगितला ‘हा’ उपाय
वर्षा बंगल्यावर आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेंना कोरोना, आता आणखी एका कर्मचाऱ्याला लागण
(Lockdown, night curfew and more in Maharashtra’s some district)