वो तो है अलबेला हजारो में अकेला
सदा तुमने अएब देखा हुनर को ना देखा
1994 साली शहारुख खान वर चित्रित या गाण्याने देशातील तरुणाईला भुरळ घातली होती. तरुणांच्या संकल्पांना दाबू नका, त्यांचे मन समजून घ्या. त्यांना त्यांच्या इच्छित मार्गाने जाऊ द्या. प्रयोग करु द्या असा संदेश देणा-या कभी हा, कभी ना हा चित्रपट कायम स्मरणात राहिला. त्यानंतर तीनच वर्षांनी जगाला स्तंभित करणारा प्रयोग भारतात झाला. जगात पहिल्यांदा भारतात डुकराचे हृदय माणसाच्या शरिरात धडकल्याची खबरबात सगळीकडे धडकली. 1997 मध्ये औषधी विज्ञान शास्त्रातील या अचंबित करणा-या प्रयोगाने देशाला हुरळून नव्हे तर हादरुन टाकले. देशातील राजकारणी तर इतके हादरले की त्यांनी हा प्रयोग राबविणारे डॉ. धनी राम बरुहा यांना थेट तुरुंगात टाकले आणि मानवी आरोग्यातील ढवळाढवळ थांबवल्याची कोण शाबासकी त्यांनी मिळवली. पण आपला हा करंटेपणा, अमेरिकेत हाच प्रयोग राबविण्यात आल्यानंतर आणि या प्रयोगाला जगाने डोक्यावर घेतल्यानंतर आपले कपाळमोक्ष करणारा ठरला.
जिवंत डुकराचे ह्दय मानवात प्रत्यारोपण झाल्याची बातमी अमेरिकेतून धडकली नी सर्वांच्या नजरा आसाममधील गुवाहाटीपासून अगदी 20 किलोमीटरच्या हाकेवर असणा-या हर्ट सिटीकडे वळल्या. 72 वर्षांचे डॉक्टर धनी राम बरुआ यांनी 25 वर्षांपूर्वी 1997 साली हा प्रयोग केला होता. आजारपणामुळे त्यांना त्यांच्या भावना फारशा व्यक्त करता आल्या नाहीत. पण त्यांच्या या प्रयोगाचे फलित अमेरिकेत दिल्याचे समाधान आणि भारतात त्यांना समजून न घेतल्याचा खेद त्यांच्या चेह-यावर दिसत होता. त्यांच्या दीर्घकाळापासून सहकारी असणा-या डॉ. गीता यांनी त्यांच्या भावना माध्यमापर्यंत पोहचवल्या. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, डॉक्टर जे काही बोलतायेत, ते फारसं समजू शकत नाही. परंतू, या वैद्यकीय प्रयोगाची आणि त्याच्या यशाची त्यांना पूर्ण जाण आहे. त्यांनी 1997 साली केलेल्या शस्त्रक्रियेची ही त्यांना आठवण आहे.
काय केला होता प्रयोग
1997 साली, डॉ. धनी राम बरुहा यांनी हॉगकॉग येथील प्रसिद्ध शल्यचिकित्सक, डॉ. जॉन्थन हो केई-शिंग यांच्या मदतीने हृदयाशी संबंधित आजारी (ventricular septal defect) असणा-या 32 वर्षीय तरुणावर हा प्रयोग केला होता. त्यांनी त्याच्यावर डुकराचे हृदय प्रत्यारोपण केले होते. त्याकाळात आरोग्य विज्ञान एवढे प्रगत नसताना हा प्रयोग करण्याचे धाडस त्यांनी दाखविले. या प्रयोगानंतर रुग्ण सात दिवस जीवंत राहिला. या प्रयोगाला देशाने डोक्यावर घेतले नाही तर हा प्रयोग राज्यकर्त्यांच्या डोक्यात गेला. हृदयावर आणि फुफ्फुसांना संसर्ग होऊन रुग्ण दगावला. डॉ. बरुआ यांचे सहकारी डॉ. जोनाधन यांना या प्रयोगाची चांगली आठवण आहे. “आम्ही डिसेंबर – 30, 1996 पासून रक्तदाते शोधत होतो. त्यानंतर हृदय प्रत्यारोपणाची योजना बनविली आणि 48 तासानंतर ती राबविली, असे त्यांनी स्पष्ट केले.
40 दिवस काढले तुरुंगात
या प्रयोगाची वार्ता सगळीकडे वा-यासारखी पसरली आणि घात झाला. मानवी अवयव प्रत्यारोपण प्रतिबंध कायद्याचा बडगा उगारत तत्कालीन सरकारने डॉ. बरुआ आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली. त्यांना गुवाहाटी तुरुंगात 40 दिवस डांबण्यात आले. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. गुवाहाटी जवळ त्यांचे क्लिनिक, प्रयोगशाळा आणि डुकर फार्म आढळले होते. सोनापूर येथे बरुआ हर्ट इन्स्टिट्यूट या प्रयोगाचे साक्षीदार आहे. चौकशीत दोषी आढळल्यानंतर पुढील 18 महिने त्यांना घरातच बंदी ठेवण्यात आले होते. त्यांचे वकील निलामणी सेन यांनी भूतकाळात डोकावताना डॉ. बरुआ हे तत्कालीन सरकारचे बळी असल्याचा दावा टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना केला आहे.
Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली