नवी दिल्ली – भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाद्वारे (IRDAI) 31 ऑक्टोबरपासून मुख्य मानसिक आजारांना (mental health) विमा संरक्षणाखाली आणण्याच्या निर्णयाचे (decision) तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. हा बदल 1 नोव्हेंबरपासून लागू झाला. सर्व विमा उत्पादने मानसिक आजारांचा समावेश करतील आणि एमएचसी कायदा, 2017 च्या तरतुदींचे पालन करतील. 18 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात, आयआरडीएआयने सर्व विमा कंपन्यांना (insurance companies) 31 ऑक्टोबर 2022 पूर्वी याला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने असे म्हटले आहे की, प्रत्येकी 3 भारतीय व्यक्तींपैकी एका व्यक्तीला डिप्रेशनचा त्रास आहे. लॅन्सेटच्या रिपोर्टनुसार, 2017 साली भारतात 19.73 कोटी लोक मानसिक आजाराने त्रस्त होते, ज्यापैकी 4.57 कोटी लोकांना डिप्रेशन डिसऑर्डर (डिप्रेशनशी संबंधित विकार) आणि 4.49 कोटी लोकांना चिंताग्रस्त डिसऑर्डरचा त्रास झाला होता. जनजागृती करून या उपक्रमामुळे आता मानसिक विकारांशी लढताना अधिकाधिक लोकांना आर्थिक मदतीचा दावा करता येणार आहे.
मात्र या नंतरही आपल्याला स्वत:ची काळजी घेणे आवश्य आहे. स्ट्रेस अवेअरनेस डेच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी स्ट्रेस व चिंता रोखण्याचा प्रभावी उपाय सांगितला आहे.
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवून स्ट्रेस करा कमी
मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सोनल आनंद यांनी टीव्ही 9 ला सांगितले की, तणाव आणि चिंता म्हणजे एखादे साधे अनुवांशिक रासायनिक असंतुलन नव्हे. हे बऱ्याच प्रमाणात आपल्या शरीराच्या स्थितीवर अवलंबून असते, जे आपण बदलू शकतो. डॉ. आनंद यांच्या सांगण्यानुसार, जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा आपल्याला अस्वस्थ आणि घाबरल्यासारखे वाटते. टेक्नॉलॉजी, कॅफेनचे सेवन आणि मद्यपानाच्या परिणामांवर लक्ष ठेवले पाहिजे व पौष्टिक आहार व पुरेशी झोप याकडे लक्ष केंद्रित करून तणाव दूर केला पाहिजे
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ब्लड शुगर ( रक्तातील साखर) नियंत्रणात अथवा स्थिर ठेवणे हे महत्वाचे ठरते. कारण त्यामुळे दैनंदिन जीवनातील चिंतेशी संबंधित भावनांवर परिणाम होतो. ब्लड शुगर नियंत्रणात राहिली तर आपल्याला मानसिक तणावापासून मुक्ती मिळू शकते. आपल्या आहारात बदल करून आपण हे साध्य करू शकतो. थोड्या-थोड्या वेळाने सूर्यफुलाच्या बिया, बदाम किंवा इतर सुकामेवा, तसेच तूप, नारळाचे तेल यांचे सेवन करावे, असे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे एक सुरक्षा जाळे तयार होते, ज्यामुळे रक्तातील साखर क्रॅश होण्याची शक्यता कमी होते. यामुळेच पॅनिक ॲटॅक येण्यापासून रोखता आल्याचे अनेक रुग्णांनी सांगितल्याचे डॉक्टरांनी नमूद केले.