Monkeypox: मंकीपॉक्सने वाढवली चिंता; आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केली मार्गदर्शक तत्वे

| Updated on: Jul 15, 2022 | 2:10 PM

मंकीपॉक्स (Monkeypox) या विषाणूजन्य रोगाचा देशातील पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला आहे. या रोगाची लक्षणे स्मॉलपॉक्ससारखीच असून हा रोग 1958 मध्ये संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या माकडांमध्ये आढळून आला होता. केरळमध्ये या रोगाचा देशातील पहिला रुग्ण सापडला असून त्या पार्श्वभूमीवर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

Monkeypox: मंकीपॉक्सने वाढवली चिंता; आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केली मार्गदर्शक तत्वे
मंकीपॉक्स
Image Credit source: Twitter
Follow us on

जगभरातील कोरोनाचा उद्रेक आता कुठे कमी होत असतानाच आता मंकीपॉक्सचे (Monkeypox) संकट उभे ठाकले आहे. गुरुवारी केरळमध्ये (Keral) या रोगाचा पहिला रुग्ण सापडला असून, त्या पार्श्वभूमीवर आता आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे (guidelines) जारी केली आहेत. ‘आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आजारी लोकांशी संपर्क टाळावा. तसेच जिवंत अथवा मृत (जंगली) जनावरांशीही संपर्क टाळावा’, असे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. गुरुवारी केरळमध्ये सापडलेला मंकीपॉक्सचा हा देशातील पहिला रुग्ण असल्याचे समजते. संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात आली होती. तसेच त्याच्या संपर्कात 11 जण आले असून त्या सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यामुळे केरळमधील आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

काय आहेत मार्गदर्शक तत्वे?

  1. आजारी लोकांपासून दूर राहा. खासकरून त्वचेला जखम असणाऱ्या किंवा जांघेत जखम असलेल्यांपासून सावध राहणे.
  2. खासकरून जिवंत किंवा मृत झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात येऊ नका. त्यातही उंदीर आणि खारसारख्या सस्तनधारी छोट्या प्राण्यांच्या तसेच माकडासारख्या प्राण्यांच्या संपर्कात येऊ नका.
  3. जंगली प्राण्यांचे मांस तयार करणे किंवा खाणे यापासून दूर राहा. तसेच आफ्रिकेतील प्राण्यांच्या मांसापासून बनवलेल्या प्रॉडक्टसपासून दूर राहा.
  4. आजारी लोकांना वापरलेल्या वस्तूंपासून दूर राहा. उदा. कपडे, अंथरूण किंवा आरोग्याशी संबंधित वस्तू. किंवा त्याचा संसर्ग झालेल्या प्राण्यापासून दूर राहा.
  5. ताप येणे आणि अंगावर व्रण येणे ही मंकीपॉक्सची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसत असतील तर तात्काळ डॉक्टरांना भेटून सल्ला घ्या. तसेच खालील कारणांसाठीही डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  6. मंकीपॉक्सची केस नोंदवली गेली किंवा रुग्ण आढळला, अशा भागांत तुम्ही गेला असाल.
  7. अथवा मंकीपॉक्स झालेला असू शकतो, अशा एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात तुम्ही आला असाल, तर त्वरित डॉक्टरांकडे जावे.

ज्या व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली आहे ती व्यक्ती तीन दिवसांपूर्वी यूएईतून भारतात आली. त्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आल्याने त्याचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये तपासणीसाठी देण्यात आले होते, त्यानंतर या प्रकरणाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.

मंकीपॉक्स विषाणूजन्य रोग

मंकीपॉक्स हा विषाणूजन्य रोग आहे. त्याची लक्षणे स्मॉलपॉक्ससारखीच असतात. हा रोग 1958 मध्ये संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या माकडांमध्ये आढळून आला होता. त्यामुळे त्याचे मंकीपॉक्स असे नाव पडले. हा विषाणू हवेतून पसरत नाही, मात्र माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाला तर त्याची लागण होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहेत या आजाराची लक्षणे?

या आजारात हातावर किंवा अंगावर मोठे फोड येतात. तसेच अंगावर पुरळ येणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणे आहेत. साधारण 2 ते 4 आठवडे हा आजार राहू शकतो. याचा मृत्यूदर 1 टक्के ते 10 टक्क्यांपर्यंत आहे. तसेच मंकीपॉक्सच्या संसर्गापासून लक्षणांपर्यंतचा काळ साधारणतः 7 ते 14 दिवसांचा असतो. मात्र तो 5 ते 21 दिवसांपर्यंत वाढू शकतो असे यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (CDC)सांगितले आहे. रूग्णांची भांडे, कपडे, अंथरूण, पांघरूण किंवा रूग्णाने वापरलेली कोणतीही गोष्ट आपण वापरली तर आपल्याला मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ शकतो.