मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने (Corona) संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजवला होता. भारतामध्ये देखील कोरोनामुळे मोठे आर्थिक नुकसान झालेच आहे तर अनेकांना आपला जीव देखील कोरोनामुळे गमवावा लागला. आता कुठे देशामध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी झाली आणि जनजीवन परत एकदा रूळावर आले असता. मंकीपॉक्स (Monkeypox) या संसर्गजन्य आजाराचे रूग्ण काही देशांमध्ये वाढताना दिसत आहेत. आता याच पार्श्वभूमीवर मंकीपॅाक्सचा धोका लक्षात घेऊन मुंबई (Mumbai) महापालिकेने महत्वाची पाऊली उचलण्यास सुरूवात केली आहे. यामुळे आता मुंबई विमानतळावर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मंकीपॉक्स हा रोग माकडांमध्ये आढळून येतो. मानवांमध्ये मंकीपॉक्सची पहिली केस 1970 मध्ये आफ्रिकेत दिसून आली होती. मात्र, आता बहुतेक रुग्ण पोर्तुगालमध्ये सापडले आहेत. या रोगाचा संसर्ग झपाट्याने होताना दिसतो आहे. मुंबई विमानतळावर अधिकारी परदेशातुन आलेल्या प्रवाशांची तपासणी करत आहेत. तसेच पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला असून, त्यांचे चाचणी नमुने एनआयव्ही पुणे प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.
मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबईमधील सर्व रूग्णालयांना सूचना देऊन सांगितले आहे की, कोणत्याही संशयित केसबद्दलची माहिती कस्तुरबा रुग्णालयाकडे तातडीने पाठवावी. मंकीपॉक्सचा मोठा धोका म्हणजे हा आजार संसर्जजन्य आहे. मंकीपॉक्स विषाणूच्या संसर्गामुळे होतो. याचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये फ्लूची लक्षणे दिसतात. बहुतेक लोक काही आठवड्यांत बरे होतात, परंतु जर परिस्थिती आणखी बिघडली तर मात्र न्यूमोनिया देखील होऊ शकतो.
मंकीपॉक्समध्ये आपली त्वचा लाल पडते, तसेच आपल्या त्वचेवर लाल रंगाची फोड येतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये त्वचेला खाज सुटते. डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, थंडी वाजून येणे, थकवा येणे आणि तापही येते. मंकीपॉक्समध्ये चेहऱ्यावर मुरूमासारखी मोठी फोड येतात. तसेच मानेवर गोवरसारखी बारीक पुरळ देखील येते. मंकीपॉक्सचा संसर्ग संपर्कात असलेल्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो. मंकीपॉक्सचा धोका असलेल्या व्यक्तीने वापरलेले कपडे वापरल्याने देखील संसर्ग होण्याची शक्यता असते.