Potatoes Good for Health: जर तुम्हाला बटाटे (potato) खायला आवडत असतील पण आरोग्याची काळजी (health care) म्हणून आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही बटाटे खाणं टाळत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एका संशोधनात (research)असं आढळून आलं आहे की, आपण समजतो तितका बटाटा हा आरोग्यासाठी घातक नसतो. अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातील जर्नल ऑफ न्यूट्रिशनल सायन्सच्या संशोधकांनी ही माहिती दिली आहे, असे वृत्त ईट धिस नॉट दॅट डॉट कॉमने दिले आहे.
या अभ्यासात 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 2,523 लोकांचा समावेश होता. त्यामध्ये सहभागी व्यक्तींच्या खाण्याच्या सवयी आणि आरोग्याचे मूल्यांकन करण्यात आले होते. बटाट्याचे नियमित सेवन केल्याने निरोगी व्यक्तीच्या कार्डिओ मेटाबॉलिक आरोग्यावर किती विपरित परिणाम होऊ शकतो हे त्यामध्ये समजून घेण्यात आले होते.
संशोधनात काय आढळले?
या संशोधनात असे आढळले की चार कप किंवा त्यापेक्षा अधिक कप पांढरे बटाटे खाल्ल्याने त्या व्यक्तीचे कोणतेही नुकसान झाले नाही. उच्च रक्तदाब आणि डिस्लिपिडेमिया सारख्या आरोग्याच्या समस्यांशी देखील याचा थेट संबंध नव्हता. याव्यतिरिक्त, तळलेले बटाटे खाल्लेल्या सहभागी व्यक्तींना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जाण्याचा धोका देखील कमी होता. मात्र लाल मांस खाण्याएवजी बटाटे खाल्ले आणि शारीरिकरित्या ॲक्टिव्ह राहिल्यास ही जोखीम कमी होते, असे आढळले. असे केल्याने त्या व्यक्तींना टाइप-2 मधुमेह होण्याची शक्यता 24 टक्के कमी होती तसेच ट्रायग्लिसराइड्स वाढण्याची शक्यताही 26 टक्के कमी झाली.
संशोधन कसे केले ?
हे संशोधन सप्टेंबर 2022 मध्ये प्रकाशित करण्यात आले. मात्र संशोधकांनी 1971 सालीच सुमारे 70% सहभागींकडून डेटा गोळा करण्यास सुरवात केली आणि पुढील काही वर्ष ते चालू होते.
लोकं किती आणि कोणत्या प्रकारचे बटाटे खातात हे या अभ्यासात दिसून आले आहे. उदाहरणार्थ, पांढरे बटाटे की गोड बटाटे? या संशोधनात असे आढळले की लोकं 36% शिजवलेले बटाटे, 28% तळलेले बटाटे, 14% मॅश केलेले बटाटे आणि 9% उकडलेले बटाटे खातात.
बटाटे खाण्याचे फायदे
– बटाटे हे मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा ट्रायग्लिसेराइड्सचा धोका वाढवत नाहीत कारण बटाटे हे प्रक्रिया न केलेले अन्न आहेत.
– बटाटा ही एक अशी भाजी आहे ज्यात उच्च प्रतीचे कार्ब आणि फायबर भरपूर असतात.
– एक कप बटाट्यामध्ये इतके पोटॅशिअम असते जे स्नायू, हृदय आणि मज्जासंस्थेचे कार्य योग्यरित्या चालण्यासाठी पुरेसे असते.
-बटाटे हे व्हिटॅमिन सीचा एक उत्कृष्ट स्रोत आहेत, जे सेल्युलर नुकसान रोखण्यासाठी अँटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करतात.