Obesity in women: लठ्ठपणा महिलांसाठी ठरू शकतो धोकादायक, हे आजार होण्याचा धोका !

| Updated on: Nov 18, 2022 | 4:11 PM

सामान्य पातळीपेक्षा अधिक वजन वाढल्यास हृदयरोग, मधुमेह आणि संधिवात यासारख्या समस्या उद्भवू शकतात. पुरूषांच्या तुलनेत महिलांना या समस्यांचा धोका अधिक असतो.

Obesity in women: लठ्ठपणा महिलांसाठी ठरू शकतो धोकादायक, हे आजार होण्याचा धोका !
Follow us on

नवी दिल्ली – आपले शरीर तंदुरुस्त व निरोगी रहावे यासाठी वजनावर नियंत्रण (control on weight) ठेवणे खूप महत्वाचे मानले जाते. सध्या वेगाने वाढणाऱ्या अनेक आजारांसाठी, लठ्ठपणा (obesity) हा प्रमुख जोखीम घटक असल्याचे दिसत आहे. लठ्ठपणाची ही समस्या पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही खूप जटिल, गुंतागुंतीची असू शकते, मात्र लठ्ठपणामुळे महिलांना (women) अधिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

काही अभ्यासांत असे दिसून आले आहे की सामान्य पातळीपेक्षा अधिक वजन असल्यास हृदयरोग, मधुमेह आणि संधिवात यासारख्या समस्या उद्भवू शकतात. पुरूषांच्या तुलनेत महिलांना या समस्यांचा धोका अधिक असतो.

हे सुद्धा वाचा

आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार आहारातील बदल, पोषक तत्वांचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तसेच व्यायाम अथवा जास्त शारीरिक हालचाल न करणे यामुळे पुरूष व महिलांमध्ये वजन वाढण्याची समस्या दिसून येत आहे. अधिक वजनामुळे आपल्या आरोग्याच्या जवळजवळ प्रत्येक पैलूवर नकारात्मक प्रभाव पडतो. महिलांमध्ये यामुळे प्रजनन व प्लोमोनरी फंक्शनवर देखील परिणाम होऊ शकतो. एवडेच नव्हे तर अधिक वजनामुळे मधुमेह, हृदय रोगाचा, स्तनाचा कर्करोग, पीसीओएस यांसारख्या आजारांचा धोकाही वाढतो.

वजन नियंत्रित करण्यासाठी सर्व लोकांनी उपाय करत राहावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. वजन जास्त असल्यामुळे महिलांमध्ये कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते, हे जाणून घेऊया.

पीसीओएसचा धोका वाढतो

ज्या महिलांचे वजन जास्त असते, त्यांना इतर महिलांच्या तुलनेत पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम (पीसीओएस) होण्याचा धोका जास्त असतो, असे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे. लठ्ठपणामुळे महिलांमधील पुनरुत्पादक हार्मोन्सच्या विषमतेमुळे ही समस्या उद्भवते. पीसीओएसमुळे मासिक पाळीतील अनियमितता, मुरूमे, शरीरावर जास्त केस येणे आणि काही परिस्थितींमध्ये प्रजननासंदर्भातही समस्या उद्भवू शकतात.

उद्भवते सांधेदुखी

मेनोपॉजनंतर शरीरात हार्मोनल बदल झाल्यामुळे पुरुषांपेक्षा महिलांना सांधेदुखीचा त्रास होण्याचा धोका जास्त असतो. एखादी महिला लठ्ठपणाचे शिकार असेल तर हा (सांधेदुखी उद्भवण्याचा) धोका आणखी वाढतो. वाढत्या लठ्ठपणामुळे, आपल्या गुडघ्यांवर अतिरिक्त दबाव येतो, ज्यामुळे ऑस्टिओआर्थ्रायटीस होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच महिलांनी वजन नियंत्रित ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला दिला जातो.

हृदयरोगाची जोखीम
तुमचे वजन सामान्य पातळीपेक्षा अधिक असल्यास तुम्हाला हृदयरोग (कोरोनरी आर्टरी डिसीज व स्ट्रोक) होण्याचा धोका जास्त असू शकतो. जास्त वजन असल्याने ब्लड लिपिड्स, विशेषत: हाय ट्रायग्लिसेराइड्स, एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब यांची समस्या वाढते. हृदयविकार टाळयचा असेल तर वजनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

कसे ठेवावे वजनावर नियंत्रण ?

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. चांगला व पोषक आहार घेणे, नियमितपणे व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आणि ताणावर नियंत्रण ठेवणे या चार गोष्टी खूप आवश्यक मानल्या जातात. विशेषत: फास्ट फूड अथवा जंक फूड, गोड पेये अथवा सोडायुक्त पेय तसेच मिठाई अथवा गोड पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे. दिनक्रमात योग्य व्यायाम आणि योगासने यांचा अंतर्भाव केल्यास वजन नियंत्रणात ठेवणे सोपे होते.

(टीप- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)