मुंबई : सध्याची पिढीही डिजीटल युगात वावरत आहे. ही पिढी मैदानी खेळापासून दुरावली असून मोबाईल, संगणक आणि इतर मनोरंजनमाध्यमात अडकली आहे. त्यामुळे आजकालची मुलं ही रोबोटिक उच्चारात बोलताना दिसतात. डिजिटल मीडिया, मनोरंजन माध्यमे आणि वाढलेल्या स्क्रीन टाइममुळे अनेक मुले रोबोटिक उच्चारात बोलू लागली आहेत. हा मेकॅनिकल म्हणजेच यंत्रवत ध्वनी एकसूरी असतो आणि हे स्वमग्नतेचे सुरुवातीचे लक्षण असू शकते, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
वर्ल्ड ऑटिझम डे म्हणजे जागतिक स्वमग्नता दिवस काल साजरा झाला. या निमित्ताने डिजिटल युग आणि आजची पिढी यावर तज्ज्ञांनी धक्कादायक माहिती दिली आहे. डिजिटल युगामुळे मुलांमध्ये होणाऱ्या बदलांवर प्रकाश टाकला आहे. मुलांना या प्रकारच्या कंटेन्टचा फक्त मौखिक भागच कळतो. मुलाच्या बाजूने विचार करता त्याला/तिला त्या कंटेन्टमधील छुप्या किंवा अमौखिक भावना समजत नाहीत. परिणामकारक संभाषणाच्या माध्यमातून संदेश देण्यासाठी हेतू हा शब्दांपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. जर संभाषणातून हेतू समजला नाही तर चुकीचा संदेश जाऊ शकतो किंवा गैरसमज होऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
स्वमग्नता हा मेंदूशी संबंधित आजार आहे. या आजारात विशिष्ट हालचाली होतात, संभाषण व सामाजिक संवादाचा अभाव असतो. स्वमग्नतेचा मुलाच्या वाणीशी संबंध आहे. कारण स्वमग्नतेत संवादावर परिणाम झालेला आहे. स्वमग्न मुलाशी पालकांच्या असलेल्या संवादावर परिणाम झालेला असल्याने ते मूल गॅजेट्स, डिव्हाइसेस आणि टीव्हीशी तुलनेने जास्त जोडलेले असते.
जेव्हा मूल अनुकरणा करण्याच्या वयात पोहोचते तेव्हा स्वमग्न मूल पालक व मुलांमधील घट्ट नात्याच्या अभावी, मूल डिजिटल मीडिया उच्चारांना प्राधान्य देते. स्वमग्न असलेल्या काही मुलांमध्ये रोबोटिक उच्चार दिसून येऊ शकतात. अर्थात, हे पूर्ण निदान होऊ शकत नाही. त्यामुळे स्वमग्न असलेले मूल आजूबाजूच्या वातावरणाशी (पालकही या वातावरणचा भाग असतात) जोडले जात नाही. कारण सोशल इंटरॅक्शनचा अभाव असतो. त्यामुळे मुलाकडून स्क्रीन टाइम कंटेन्टचे अनुसरण केले जाण्याची शक्यता जास्त असते.
ऐकण्याशी संबंधित विकार असलेली जी मुले वयाच्या दुसऱ्या वर्षी रोबोटिक उच्चार करतात ते स्वमग्नतेची सुरुवातीची लक्षणे दर्शवत असतात. जर मूल परिणामकारकपणे संवाद साधू शकत नसेल आणि त्याचे उच्चार यंत्रवत असतील तर पालकांनी डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक आहे, असं डॉ. सुमीत शिंदे यांनी म्हटलं आहे.
चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटरमधील वरिष्ठ सल्लागारांच्या म्हणण्यानुसार, ते दररोज तपासणी करत असलेल्या दर 10 मुलांपैकी 8 मुले स्वमग्नतेच्या कक्षेत असतात. गेल्या दशकभरात स्वमग्न मुलांच्या संख्येत खूप वाढ झाली आहे आणि पालकांना संभाषणासंदर्भातील आजारांच्या संकेतांची जाणीव असणे आवश्यक आहे. पालक-मुलांमध्ये अधिकाधिक संवाद होणे आणि स्क्रीन टाइम कमी असणे गरेजेचे आहे, जेणेकरून मुले अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतील. रोबोटिक उच्चार व संवादासंबंधीचे विकार वेळीच ओळखून पालकांनी लगेच पावले उचलणे गरजेचे आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.