कोरोना महामारीच्या (corona) काळात लोक बराच वेळ घरातच राहिले होते. त्यामुळे लॅपटॉप आणि फोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. तासनतास स्क्रीनवर (screen) वेळ घालवल्यामुळे लोकांच्या डोळ्यांनाही (eyes problem) इजा झाली. ज्यामुळे डोळ्यांच्या आजाराचे रुग्ण वाढले. लोकांना मायोपिआ, ग्लूकोमा( काचबिंदू) आणि डोळे कोरडे होण्याचा त्रास होऊ लागला. डोळ्यांच्या बहुतांश आजारांची लक्षणे सुरुवातीलाच आढळून येतात, मात्र लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि परिस्थिती गंभीर झाल्यावर रुग्णालयात येतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्याचा दुसरा गुरुवार हा वर्ल्ड साइट डे (world sight day) म्हणून साजरा केला जातो.
दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमधील नेत्ररोग विभागाचे प्रमुख ए.के.ग्रोव्हर यांच्या सांगण्यानुसार, डोळ्यांच्या आजारात ग्लूकोमा म्हणजेच काचबिंदूच्या अनेक केसेस दिसून येतात. या आजारात डोळ्याची ऑप्टिक नस खराब होते. ही समस्या वृद्ध लोकांमध्ये अधिक सामान्य असते. त्याची लक्षणेही सहज शोधता येतात. एखाद्याला अंधुक दिसणे, डोळे कोरडे पडणे आणि डोकेदुखीचा त्रास असेल तर ही ग्लूकोमाची म्हणजेच काचबिंदूची लक्षणे आहेत. अशावेळी नेत्र तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
डोकेदुखी हा केवळ न्यूरोचा त्रास नाही –
डॉ. ग्रोव्हर सांगतात की, अनेक वेळा डोळ्यांच्या समस्येमुळे लोकांना डोकेदुखीचा त्रास होतो, पण ते त्याला न्यूरो डिसीज समजून त्यावर उपचार करतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा ही समस्या सुटत नाही. डॉक्टरांच्या मते, डोकेदुखी हे डोळ्याच्या आजाराचे लक्षण असू शकते. डॉक्टरांच्या मते, डोळ्यांचे स्नायू कमकुवत झाल्याने देखील डोकेदुखी होऊ शकते. हे ग्लूकोमाचे (काचबिंदू) लक्षण देखील असू शकते. त्यामुळे सतत डोकेदुखीचा त्रास झाल्यास डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचे आहे.
स्क्रीन टाइम मुळेही होतो त्रास –
डॉ. ऋषीराज बोरा यांच्या सांगण्यानुसार, आजकाल सर्वांच्या आयुष्यात स्क्रीनसमोर (कामानिमित्त) वेळ घालवणं खूप गरजेचं झालं आहे. यामुळे आपल्या डोळ्यांसंदर्भात अनेक समस्या निर्माण होत आहेत. स्क्रीन समोर असताना डोळ्यांना अधिक काम करण्याची गरज असते, त्यामुळे स्क्रीन खूप जवळ न ठेवता एका हाताच्या अंतरावर ठेवल्यास डोळ्यांवर येणारा ताण कमी होऊ शकतो. तसेच अशावेळी तुमच्या स्क्रीनचा ब्राइटनेस कमी करावा. त्याशिवाय काम करतातना थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घेत रहावा.
स्क्रीनसमोर काम करताना डोळ्यांना आराम देण्यासाठी तुम्ही 20-20-20 नियमाचे पालन करावे. त्यासाठी दर 20 मिनिटांनी 20 सेकंदांसाठी 20 फूट अंतरावर असलेल्या एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. यामुळे डोळ्यांना खूप आराम मिळेल.